सोनाली कुलकर्णी - अमृता सुभाष पहिल्यांदाच एकत्र; ‘परिणती’च्या पोस्टरमधून झलक, रिलीज डेटही जाहीर

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.
सोनाली कुलकर्णी - अमृता सुभाष पहिल्यांदाच एकत्र; ‘परिणती’च्या पोस्टरमधून झलक, रिलीज डेटही जाहीर
Published on

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘परिणती - बदल स्वतःसाठी’ हा त्यांचा नवा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय बाळसराफ दिग्दर्शित आणि पराग मेहता व हर्ष नरूला निर्मित हा सिनेमा दोन वेगवेगळ्या जगातल्या स्त्रियांभोवती फिरतो. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून त्यात एक पारंपरिक वेशात आत्मविश्वासानं भरलेली स्त्री दिसते आणि दुसरी साधेपणात रमलेली, शांत वाटणारी. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधला हा विरोध आणि त्यातून घडणारा प्रवास हा चित्रपटाचा गाभा आहे.

‘परिणती’ विषयी बोलताना दिग्दर्शक म्हणतात, “या चित्रपटात दोन अशा स्त्रिया आहेत ज्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या असल्या तरी एका टप्प्यावर त्यांच्या आयुष्याचा मोड बदलतो. त्या एकमेकींच्या आयुष्यात येतात आणि स्वतःसाठी काहीतरी वेगळं करायचं ठरवतात. सोनाली आणि अमृताने या भूमिका अगदी मनापासून साकारल्या आहेत.”

‘परिणती’ ही केवळ मैत्रीची गोष्ट नाही, तर स्वतःला सापडण्याचा आणि आयुष्यात स्वतःसाठी काहीतरी बदल घडवण्याचा प्रवास आहे. दोन प्रतिभावान अभिनेत्रींच्या एकत्र येण्यामुळे प्रेक्षकांना एक खास अनुभव मिळणार, हे नक्की!

logo
marathi.freepressjournal.in