

अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना सुधा चंद्रन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात आयोजित करण्यात आलेल्या देवीच्या पूजेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत, त्यांची थट्टा केली. व्हिडिओमध्ये त्या देवीच्या भक्तीत तल्लीन असताना अचानक बेशुद्ध पडतात, त्यानंतर विचित्र हसू व हावभाव करताना दिसतात. हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी त्यांच्या अंगात देवी आल्याचं म्हटलं, तर काहींनी हे सगळं नाटक असल्याचं म्हणत खिल्ली उडवली. या ट्रोलिंगनंतर सुधा चंद्रन यांनी अखेर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'मला लोकांशी काहीही देणंघेणं नाही' - सुधा चंद्रन
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सुधा चंद्रन म्हणाल्या,"तो एक असा क्षण होता, जो प्रत्येकजण जगू पाहतो. ज्यामध्ये देवी शक्ती तुमच्यात येऊन तुम्हाला ती ऊर्जा देते. देवीचा आशीर्वाद खूप कमी लोकांना मिळतो आणि मी त्यापैकी एक होते. माझ्या माध्यमातून लोकांना आशीर्वाद मिळत असेल तर माझ्या आयुष्यातील हा सर्वांत आनंदी क्षण आहे. जीवनाकडे पाहण्याचा माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. ज्याचा मी मनापासून आदर करते. मला लोकांशी काहीही देणंघेणं नाही. जे माझी थट्टा करतात किंवा ट्रोल करतात, त्यांनी आपापल्या आयुष्यात खुश राहावं. पण जे लाखो लोक या भक्तीशी जोडले गेले, तेच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहेत."
"लोक काय म्हणतील?" याचा विचार मी कधीच केला नाही, असं सांगताना त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाचाही उल्लेख केला. लहान वयात झालेल्या भीषण अपघातानंतर पाय गमावूनही त्यांनी हार मानली नाही. त्या काळातही लोकांनी टीका केली होती, मात्र आज त्याच संघर्षाची यशोगाथा लोकांसमोर उदाहरण ठरली आहे.
शेवटी त्या म्हणाल्या, “भक्ती हा पूर्णपणे वैयक्तिक विषय आहे. मी कुणाच्या भक्तीवर टीका करत नाही आणि माझ्या भक्तीबाबत कुणालाही उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. मी आजपर्यंत आयुष्य सन्मानाने, आदराने आणि देवाच्या आशीर्वादाने जगले आहे आणि पुढेही तसंच जगत राहणार."