

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे आईबाबा झाले आहेत. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, घटस्थापनेच्या मुहूर्तावर दोघांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत कन्यारत्न झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. त्यांच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
खास फोटो आणि कॅप्शनमधून दिली गुडन्यूज
सुरुची आणि पियुष यांनी इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आईबाबांच्या हातात चिमुकल्या बाळाचा हात दिसत असून, गुलाबी फुलांनी सजवलेल्या कार्डवर 'It's a Baby Girl' असं लिहिलं आहे. त्याखाली सुरुची आणि पियुष यांची नावंही आहेत.
या फोटोसोबत दोघांनी एक गोड कॅप्शन दिलं आहे. "आम्ही दोघांची एक टीम होतो, पण आयुष्याने आम्हाला आमच्या टीममधील सर्वात सुंदर साथीदार दिला," असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या या पोस्टमधून आईबाबा झाल्याचा आनंद व्यक्त होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी ही बातमी शेअर केल्याने चाहत्यांनीही दोघांचं अभिनंदन केलं आहे.
कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सुरुची आणि पियुष यांच्या पोस्टवर मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नम्रता संभेराव, श्रेया बुगडे, गिरिजा प्रभू, अद्वैत दादरकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट करत दोघांचं अभिनंदन केलं आहे.
लग्नानंतर तीन वर्षांनी चिमुकलीचं आगमन
सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर जवळपास तीन वर्षांनी त्यांच्या कुटुंबात नव्या सदस्याचं आगमन झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरुची गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, दोघांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. आता मुलगी झाल्याची आनंदाची बातमी शेअर करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.