दिवाळीच्या सणात प्रेक्षकांना खास भेट देण्यासाठी सज्ज झालाय दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा नवा चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’. रोमँस, फॅन्टसी आणि नेत्रदीपक व्हीएफएक्स यांचा संगम असलेला हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. त्यातच या चित्रपटातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिचं आकर्षक नृत्य प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढवतंय.
या चित्रपटातील सर्वात खास गोष्ट म्हणजे स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. ट्रेलरमधूनच त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळाली असून, दोघांची टायमिंग आणि संवादशैली प्रेक्षकांना हसवणारी आणि भावणारी ठरणार आहे. या चित्रपटात स्वप्निल आणि भाऊ हे देवाच्या भूमिकेत दिसतील. यापूर्वी स्वप्निलने श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं, आणि आता पुन्हा तो एका नव्या देवभूमिकेत झळकणार आहे.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. ‘प्रेम आणि नशिबाचा जादुई प्रवास’ सांगणारा ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर, म्हणजेच २१ ऑक्टोबरला, एक खास सिनेमॅटिक गिफ्ट ठरणार आहे.