Tanvi Kolte : मराठी जिंकलं, आता 'बिग बॉस हिंदी'मध्ये एंट्री? विजेत्या तन्वी कोलतेने दिलं उत्तर; म्हणाली - "ऑफर मिळाली..."

‘बिग बॉस मराठी ६’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वी कोलतेने आता चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. ‘बिग बॉस हिंदी’मध्ये जाणार का? या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तरामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
मराठी जिंकलं, आता 'बिग बॉस हिंदी'मध्ये एंट्री? विजेत्या तन्वी कोलतेने दिलं उत्तर; म्हणाली - "ऑफर मिळाली..."
मराठी जिंकलं, आता 'बिग बॉस हिंदी'मध्ये एंट्री? विजेत्या तन्वी कोलतेने दिलं उत्तर; म्हणाली - "ऑफर मिळाली..."
Published on

‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती ठरल्यानंतर अभिनेत्री तन्वी कोलते सध्या जोरदार चर्चेत आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वीच्या चाहत्यांमध्ये तिच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता वाढली असून, ती आता ‘बिग बॉस हिंदी’मध्ये झळकणार का? याबाबतही चर्चा रंगू लागली आहे. अशातच तन्वीने 'फ्री प्रेस जर्नल'ला दिलेल्या एका मुलाखतीत यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

‘ऑफर आली तर नक्की जाईन’

मुलाखतीदरम्यान तन्वीला ‘बिग बॉस मराठी’नंतर ‘बिग बॉस हिंदी’मध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तन्वीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. ती म्हणाली, "जर मला ऑफर मिळाली तर मी नक्की जाईन. तिथेही मी माझं १०० टक्के देईन. गेम कसा खेळायचा, स्वतःला कसं सादर करायचं हे मला माहित आहे." तन्वीच्या या उत्तरानंतर तिच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राखी सावंतकडूनही मोठा सपोर्ट

तन्वीच्या विजयानंतर अभिनेत्री राखी सावंतनेही तिचं कौतुक करत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने तन्वीला ‘बिग बॉस हिंदी’मध्ये संधी द्यावी, अशी मागणी केली होती. याबाबत बोलताना तन्वी म्हणाली, "राखीची इच्छा आहे की मी हिंदी बिग बॉसमध्ये जावं. ती नेहमी सांगते की मी त्या शोसाठी योग्य आहे आणि तिथेही चांगला खेळ खेळू शकते."

‘मराठी जिंकलं, आता हिंदीची तयारी’

तन्वीने पुढे सांगितलं की, "मी मराठी बिग बॉस जिंकले आहे. आता हिंदी बिग बॉससाठी प्रयत्न करेन. संधी मिळाली तर पूर्ण ताकदीने खेळेन. मात्र पुढे काय होईल, हे सध्या सांगता येणार नाही." या वक्तव्यानंतर आता ‘बिग बॉस हिंदी’च्या पुढील सीझनमध्ये तन्वी दिसणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

‘बिग बॉस मराठी ६’मधील दमदार प्रवास

तन्वी कोलतेचा ‘बिग बॉस मराठी ६’मधील प्रवास अनेक कारणांनी चर्चेत राहिला. घरातील टास्कमध्ये तिची आक्रमक शैली, अन्यायाविरोधात घेतलेली भूमिका, स्पष्टवक्तेपणा आणि काही प्रसंगी दिसलेला शांत स्वभाव यामुळे ती प्रेक्षकांची आवडती स्पर्धक बनली.

विशाल कोटियनसोबतची स्पर्धा, घरातील वाद, काटा गॅंगचे मैत्रीचे क्षण आणि कॅप्टन्सीची जबाबदारी या सर्व टप्प्यांत तन्वीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच ती विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती.

तन्वीच्या पुढच्या कारकिर्दीकडे लक्ष

‘बिग बॉस मराठी ६’चा प्रवास संपला असला, तरी तन्वी कोलतेच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. मालिकांपासून रिॲलिटी शोपर्यंत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या तन्वीची पुढची वाटचाल कशी असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, ती ‘बिग बॉस हिंदी’मध्ये गेली तर मराठी प्रेक्षक पुन्हा एकदा तिच्या पाठिशी उभे राहतील, यात शंका नाही.

logo
marathi.freepressjournal.in