

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईचा माहोल रंगला आहे. नुकतीच लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आपला साखरपुडा पारंपरिक थाटामाटात केला असून तिच्या या खास दिवसाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
राजकीय घराण्यात साखरपुडा
तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा शिवसेना (शिंदे गट) चे नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र आणि युवानेते समाधान सरवणकर यांच्यासोबत झाला आहे. या समारंभाला राजकीय तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
तेजस्विनीने या प्रसंगी लाल रंगाची साडी नेसली होती, तर खुले केस आणि हलका मेकअप तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवत होता. तिच्या या देखण्या अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
तेजस्विनी लोणारी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ‘छापा काटा’, ‘वॉण्टेड बायको नंबर वन’, ‘गुलदस्ता’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, आणि ‘कलावती’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. तसेच ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतही ती झळकली होती. प्रेक्षकांनी तिचा ‘बिग बॉस मराठी’ मधील सहभागही आवडला होता.
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
तेजस्विनीच्या या नव्या प्रवासासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक चाहत्यांनी “सुंदर जोडी”, “परफेक्ट कपल”, “नव्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा” असे कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.