मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची आई ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
ज्योती चांदेकर यांनी आपल्या पाच दशकांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक गाजलेले चित्रपट, नाटकं आणि मालिका केल्या. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातील सिंधुताईंची भूमिका विशेष गाजली. ‘ठरलं तर मग’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली. याशिवाय गुरु, ढोलकी, पाऊलवाट, सलाम, सांजपर्व यांसारख्या चित्रपटांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरील ‘तू सौभाग्यवती हो’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.
आई-मुलगी या जोडीनं 2015 मध्ये ‘तिचा उंबरठा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी सासूची, तर तेजस्विनी पंडितनं सुनेची भूमिका साकारली होती. या अभिनयासाठी दोघींना झी गौरव पुरस्कारांत गौरवण्यात आलं होतं.
बारा वर्षांच्या वयात अभिनयाची सुरुवात केलेल्या ज्योती चांदेकर यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमांत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.