
नुकताच प्रदर्शित झालेला ‘ये रे ये रे पैसा ३’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने 'नवशक्ती'सोबत संवाद साधताना या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या खडतर काळाबद्दल अनुभव शेअर केला.
तेजस्विनीने सांगितलं, मागचं वर्ष तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं. ती केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही खूप तणावात होती. त्याच वेळी ‘ये रे ये रे पैसा ३’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. शूटिंगदरम्यान तिला स्लिप डिस्कसारख्या गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला. त्यातच तिला डेंग्यूही झाला होता. एवढं असूनही, तिने सलाइन लावून चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं.
पण, तिच्या चेहऱ्यावर कुठेही आजारी असल्याचं लक्षण नव्हतं आणि हेच तिच्या अभिनयातील समर्पण दर्शवतं. तिने सांगितलं, की ''श्रेय हेच आहे की या चित्रपटाचं किंवा टीमचं, म्हणजे माझे अत्यंत जिगरी दोस्त आहेत. कुठेही माझ्या चेहऱ्यावर कळणार नाही, की मी आजारी होते.''
तब्येत अत्यवस्थ झाल्यानं दीड तास शूटिंग थांबवावं लागलं, पण त्यावेळी संपूर्ण टीमने तिला मानसिक आधार दिला, असेही तिने सांगितले. चित्रपटाच्या टीमने आणि तिच्या मित्रांनी तिला सावरलं आणि प्रोत्साहन दिलं, याबद्दल तेजस्विनीने त्यांचे आभार मानले आहेत. इतकेच नव्हे तर तेजस्विनी ‘ये रे ये रे पैसा'च्या पहिल्या भागातही आजारी होती आणि तेव्हाही तिने सलाईन लावून चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केल्याचं सांगितलं.
‘ये रे ये रे पैसा ३’ या चित्रपटामध्ये हास्य, अॅक्शन आणि ड्रामाचा अफलातून संगम पाहायला मिळतो. संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात आणि जयवंत वाडकर यांसारख्या मातब्बर कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं आहे.