

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं कतरिना कैफ आणि विकी कौशल काही दिवसांपूर्वीच आई–बाबा झाले. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर तब्बल दोन महिन्यांनी या जोडप्याने आपल्या लाडक्या लेकाची पहिली झलक जगासमोर आणत त्याचं नावही जाहीर केलं आहे.
आमचा आशेचा किरण… विहान!!
७ डिसेंबर रोजी विकी आणि कतरिनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ते दोघं आपल्या बाळाचा छोटासा हात हातात धरताना दिसत आहेत. फोटोसोबत त्यांनी लिहिलं, "आमचा आशेचा किरण… विहान कौशल (Vihaan Kaushal). आमच्या प्रार्थना फळाला आल्या. आयुष्य खूप सुंदर झालंय. एका क्षणात सर्व काही बदलून गेलं." अशा शब्दांत त्यांनी आपल्या मुलाचं नाव ‘विहान कौशल’ असल्याचं जाहीर केलं.
'उरी'शी नातं जुळलं कसं?
विकी आणि कतरिनाने नावामागचा नेमका अर्थ किंवा किस्सा सांगितलेला नसला, तरी चाहत्यांनी त्यामागचं खास कनेक्शन शोधून काढलं आहे. विक्की कौशलच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरलेला चित्रपट म्हणजे 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक’. या चित्रपटात विकीने मेजर विहान सिंह शेरगिल ही प्रमुख भूमिका साकारली होती. याच नावाशी आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याचंही नातं जुळल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या चर्चेला आणखी बळ मिळालं ते 'उरी' आणि 'धुरंधर'चे दिग्दर्शक आदित्य धर यांच्या सोशल मीडिया कमेंटमुळे. विकी-कतरिनाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना आदित्य धर यांनी लिहिलं, "दोघांचं मनापासून अभिनंदन! माझ्या विक्कू, पडद्यावर मेजर विहान शेरगिलला जिवंत करण्यापासून ते आता छोट्या विहानला आपल्या कुशीत घेण्यापर्यंत… आयुष्य खरंच पूर्ण वर्तुळात फिरून आलं आहे. तुम्हा तिघांनाही भरपूर प्रेम आणि आशीर्वाद."
या एका कमेंटनंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे की, हा केवळ योगायोग आहे की 'उरी'च्या यशस्वी प्रवासाची आठवण जपण्यासाठी घेतलेला खास आणि भावनिक निर्णय.
विकीच्या करिअरमधील ‘उरी’चं महत्त्व
'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'मध्ये साकारलेल्या मेजर विहान सिंह शेरगिलच्या भूमिकेसाठी विकी कौशलला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्वात गाजलेल्या आणि निर्णायक भूमिकेचं नाव विकीने आपल्या मुलाला दिलं असावं, असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत.