बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल; चित्रपट करण्याच्या बहाण्याने डॉक्टरांचे ३० कोटी हडपल्याचा आरोप

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नी श्वेकांबरी भट्ट यांच्यावर गंभीर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातील उदयपूरमध्ये त्यांच्यासह एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल; चित्रपट करण्याच्या बहाण्याने डॉक्टरांचे ३० कोटी हडपल्याचा आरोप
Published on

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेकांबरी भट्ट यांच्यावर गंभीर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातील उदयपूरमध्ये त्यांच्यासह एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांनी दाखल केलेल्या या तक्रारीमुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

अलीकडेच मार्च २०२५ मध्ये 'तुमको मेरी कसम' हा भट्ट यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील मुख्य भूमिका अनुपम खेर यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे हे पात्र तक्रारदार डॉ. अजय मुरडिया यांच्यावर आधारित आहे. आता डॉ. अजय मुरडिया यांनीच विक्रम भट्ट यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

दिवंगत पत्नीच्या बायोपिकचा प्रस्ताव

डॉ. अजय मुरडिया यांच्या तक्रारीनुसार, एका कार्यक्रमात त्यांची उदयपूरमधील दिनेश कटारिया याच्याशी ओळख झाली. कटारियाने विक्रम भट्ट यांच्याशी त्याचा चांगला संबंध असल्याचा दावा केला. कटारियाने डॉक्टरांना त्यांच्या दिवंगत डॉक्टर पत्नीचा बायोपिक तयार करण्याची कल्पना मांडली. हा बायोपिक त्यांच्या पत्नीच्या कार्याची जगाला ओळख करून देईलच, शिवाय प्रदर्शनानंतर '२०० कोटींचा नफा' होईल, असेही आश्वासन दिले.

डॉक्टरांना ही कल्पना रुचली आणि २५ एप्रिल २०२४ रोजी ते कटारियासोबत मुंबईत गेले. वृंदावन स्टुडिओमध्ये झालेल्या भेटीत विक्रम भट्ट यांनी सर्व प्रकल्पाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांकडून लागणारा निधी कटारिया सांभाळेल, अशी व्यवस्था ठरली.

एका बायोपिकचे रूपांतर चार चित्रपटांत

भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून डॉक्टरांनी पहिली २.५ कोटींची रक्कम ३१ मे २०२४ रोजी हस्तांतरित केली. काही दिवसांनी हा करार एका बायोपिकवरून चार वेगवेगळ्या चित्रपटांच्या योजनांपर्यंत पोहोचला. प्रत्येक टप्प्यावर पैशांची मागणी वाढत राहिली आणि डॉक्टरांनी एकूण ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिल्याचे सांगितले. परंतु, काही महिन्यांनंतर परिस्थिती संशयास्पद वाटू लागली. डॉक्टरांच्या लक्षात आले की चारपैकी दोन चित्रपट पूर्ण झाले आहेत, एक चित्रपट अर्धवट, तर ‘महाराणा-रण’ या चौथ्या महागड्या चित्रपटाचे शूटिंग सुरूही झालेले नाही. पण यावर तब्बल २५ कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात आल्याने डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेतली.

डॉ. अजय यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर भूपालपुरा पोलीस ठाण्यात विक्रम भट्ट, श्वेकांबरी भट्ट, दिनेश कटारिया यांच्यासह ८ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in