

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमध्ये अडकलेला मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार अखेर सुरक्षितपणे भारतात परतला आहे. लंडनकडे जाणाऱ्या प्रवासादरम्यान त्याचे विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आले होते. त्यानंतर परिसरातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे तो काही दिवस तिथेच अडकून पडला होता. मुलाला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी विशाखा सुभेदार यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची विनंती केली होती.
शिंदे यांची तात्काळ दखल
सोशल मीडियावर विशाखा सुभेदार यांनी मुलाच्या मदतीसाठी केलेल्या व्हिडिओची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी अभिनय सुभेदार याच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही विशाखा सुभेदार यांच्याशी फोनवर संवाद साधत मुलाला सुरक्षित भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. या प्रयत्नांनंतर अखेर अभिनय सुभेदार भारतात परतला असून कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला आहे.
"दहा दिवसांनी मुलाला पाहिलं"
मुलगा भारतात परतल्यानंतर विशाखा सुभेदार यांनी एबीपीशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "मदतीसाठी व्हिडिओ केला तेव्हा डोळ्यांत पाणी होतं आणि आज आनंदाश्रू आहेत. जवळजवळ दहा दिवसांनी मी माझ्या मुलाला पाहिलं. तो ज्या हॉटेलमध्ये राहत होता त्याच्या जवळच मिसाईल आणि ड्रोन पडत असल्याचं तो सांगायचा. त्यामुळे आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो."
त्या पुढे म्हणाल्या की, कुटुंबातील सर्वजण अभिनय कधी भारतात परततो याचीच वाट पाहत होते. कुवेतमध्ये सतत सायरन वाजत असल्यामुळे तिथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सरकारच्या मदतीमुळे शक्य
विशाखा सुभेदार यांनी सांगितले की, मुलाला परत आणण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. "मी सोशल मीडियावर मदतीचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, मनोज मुंढे आणि मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत पुढाकार घेतला," असे त्यांनी सांगितले.
कुवेतहून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेले व्हिसा आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दूतावासाच्या माध्यमातून मदत मिळाली. या सर्व प्रयत्नांमुळे अखेर अभिनय भारतात परतू शकला, असे त्यांनी नमूद केले.
"एका दिवसात २० मिसाईल पडताना पाहिले"
अभिनय सुभेदार यांनीही तिथल्या परिस्थितीबद्दल सांगताना म्हटले की, "आजूबाजूला एका दिवसात २० - २० मिसाईल पडताना आम्ही पाहिले. त्यामुळे हॉटेलमध्ये राहतानासुद्धा भीती वाटत होती. मात्र स्थानिक प्रशासन आणि सुरक्षायंत्रणेमुळे मोठी दुर्घटना टळली.”
सोशल मीडियावरून केली होती मदतीची विनंती
दरम्यान, विशाखा सुभेदार यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून मुलगा कुवेतमध्ये अडकला असल्याची माहिती दिली होती. लंडनला जात असताना फ्लाइट कुवेतमध्ये उतरवण्यात आल्याने तो तिथेच थांबला असल्याचे त्यांनी सांगितले होते. परिसरातील तणाव वाढत असल्याचे सांगत त्यांनी मुलाला भारतात आणण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी कळकळीची विनंती केली होती.
या घटनेनंतर अखेर अभिनय सुभेदार सुरक्षितपणे भारतात परतल्याने कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.