
सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांना धक्का बसला. झुबीन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना निधन झाले. ते नॉर्थईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले होते आणि कॉन्सर्टपूर्वी हा अपघात झाला. झुबीन यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या कथा समोर येत आहेत. अलिकडेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी खुलासा केला की त्यांनी स्कूबा डायव्हिंग करताना लाईफ जॅकेट घातले नव्हते, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण, आज मुख्यमंत्री सरमा यांनी जाहीर केले की, गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी नॉर्थईस्ट फेस्टिव्हलचे आयोजक आणि व्यवस्थापकांविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सरमा यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आणि या प्रकरणातील पुढील कारवाईबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, की नॉर्थईस्ट फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकनू महंता आणि व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना ६ ऑक्टोबर रोजी गुवाहाटीला येऊन पोलिसांसमोर निवेदन द्यावे. अन्यथा, पोलिस त्यांच्यासाठी शोधमोहीम तीव्र करतील. सध्या दुर्गा पूजेचे औचित्य असल्याने त्यांना तत्काळ येऊ नये असे सरकारला वाटते, पण दशमी नंतर त्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंगापूरमधील मृत्यूची चौकशी
१९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात बुडून झुबीन गर्ग यांचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी CID करत आहे. सरमा यांनी सांगितले की, जर संबंधितांना CID समोर हजर राहायचे नसेल, तर ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात.
खाते गोठवले
आयोजक श्यामकनू महंतांचे बँक खाते आणि क्रेडिट कार्ड गोठवण्यात आले आहेत, जेणेकरून ते दीर्घकाळ परदेशात राहू शकणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
सरकार सिंगापूरहून गर्ग यांचा शवविच्छेदन अहवाल मागवत आहे. तसेच गुवाहाटी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या शवविच्छेदनाचा अहवाल तयार असल्याची माहिती सरमा यांनी दिली.
पोलिस तपासात पारदर्शकता राहावी यासाठी विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
CBI तपासाची शक्यता
सरमा यांनी स्पष्ट केले की, “ज्या दिवशी असे वाटेल की आसाम पोलिस झुबीनला न्याय देऊ शकत नाहीत, त्या दिवशी हे प्रकरण CBI कडे सोपवले जाईल. या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही माहिती दिल्याचे सांगितले.
संयम राखण्याचे आवाहन
लोकांना संयम राखण्याचे आवाहन करताना सरमा म्हणाले की, “झुबीनच्या नावाखाली सरकारविरोधी राजकारण होऊ नये. आसामला नेपाळसारख्या परिस्थितीत ढकलण्याचा प्रयत्न करू नका.”
नेपाळमध्ये अलीकडेच केपी शर्मा ओली सरकारकडून सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर देशव्यापी आंदोलन पेटले होते. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत सरमा यांनी आसाममधील नागरिकांना शांतता आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले.