Apple ने प्रसिद्ध युट्युबरवर दाखल केला खटला; iOS 26 ची गोपनीय माहिती चोरण्याचा आरोप

प्रसिद्ध टेक कंपनी Apple ने एका प्रसिद्ध युट्यूबरवर गंभीर आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. 'फ्रंट पेज टेक' या युट्यूब चॅनेलसाठी ओळखल्या जाणाऱ्या Jon Prosser याच्यावर Apple ची गोपनीय माहिती चोरण्याचा आणि ती सार्वजनिक करून आर्थिक फायदा मिळवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Apple ने प्रसिद्ध युट्युबरवर दाखल केला खटला; iOS 26 ची गोपनीय माहिती चोरण्याचा आरोप
Published on

प्रसिद्ध टेक कंपनी Apple ने एका प्रसिद्ध युट्यूबरवर गंभीर आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. 'फ्रंट पेज टेक' या युट्यूब चॅनेलसाठी ओळखल्या जाणाऱ्या Jon Prosser याच्यावर Apple ची गोपनीय माहिती चोरण्याचा आणि ती सार्वजनिक करून आर्थिक फायदा मिळवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीने अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील फेडरल कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Apple च्या मते, Michael Ramacciotti या व्यक्तीने एका Apple कर्मचाऱ्याच्या iPhone वरून iOS 26 संबंधित गोपनीय माहिती चोरली आणि ती Jon Prosser ला दिली. Prosser ने जानेवारी 2025 मध्ये ही माहिती आपल्या युट्यूब चॅनेलवर प्रकाशित केली होती.

गुरुवारी (१७ जुलै) Apple ने कॅलिफोर्नियाच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार, Ramacciotti ने Apple कर्मचाऱ्याचा फोन हॅक करून ही माहिती मिळवली. Ramacciotti हा एक प्रॉडक्ट अ‍ॅनालिस्ट आणि व्हिडिओ एडिटर आहे. कंपनीचा आरोप आहे, की Ramacciotti ने पैशांची गरज असल्यामुळे ही माहिती चोरली आणि FaceTime कॉलद्वारे Prosser ला दाखवली. Prosser ने तो कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावर आधारित एक व्हिडिओ तयार करून तो आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केला. या व्हिडिओतून Prosser ला जाहिरातींमधून आर्थिक नफा मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

याचिकेमध्ये Apple ने न्यायालयाकडे आर्थिक नुकसानभरपाईची आणि Prosser आणि Ramacciotti यांनी Apple च्या ट्रेड सीक्रेट्सचा वापर त्वरित थांबवावा आणि भविष्यात अशा प्रकारची माहिती प्रसारित करू नये, यासाठी न्यायालयीन आदेश जारी करण्याची मागणी केली आहे.

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, Jon Prosser ने आपल्या व्हिडिओमध्ये iOS 26 ची काही खास आणि गोपनीय वैशिष्ट्ये दाखवली होती, जी Apple ने अजून जाहीरही केलेली नव्हती. यात एक नवीन कॅमेरा अ‍ॅप होतं, ज्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ मोड बदलणं खूप सोपं केलं होतं. मेसेजेस अ‍ॅपचं नवीन डिझाइनही दाखवलं गेलं होतं. नवीन प्रकारचं बटण, नवीन प्रकारचा कीबोर्ड आणि 'लिक्विड ग्लास' नावाचं खास इंटरफेस होतं, जे पाहायला काचेसारखं चमकदार आणि स्टायलिश दिसतं. ही माहिती लवकर बाहेर आल्यामुळे Apple च्या गोपनीयतेला मोठा धक्का बसला, असं कंपनीचं म्हणणं आहे.

तसेच, Jon ने X वर पोस्ट करत म्हटले, की "स्पष्ट सांगायचं झालं, तर माझ्याकडून हा प्रकार तसा घडलाच नाहीये. माझ्याकडे याचे पुरावेही आहेत. मी कोणाचाही फोन अ‍ॅक्सेस करण्याचा 'कट' रचला नव्हता. माझ्याकडे कोणतेही पासवर्ड नव्हते. ही माहिती कशी मिळवली गेली, याची मला काहीच कल्पना नव्हती. या संबंधी Apple सोबत बोलण्यास मी उत्सुक आहे."

logo
marathi.freepressjournal.in