Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

१७ वर्षांच्या स्वयंनिर्वासानंतर BNP नेते तारिक रहमान बांगलादेशात परतले आहेत. ढाक्यात त्यांच्या स्वागतासाठी लाखो समर्थक जमले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील राजकारण तापले आहे.
Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?
Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?
Published on

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारीक रहमान तब्बल १७ वर्षांच्या निर्वासित म्हणून राहिल्यानंतर अखेर बांगलादेशात परतले आहेत. गुरुवारी (दि.२५) राजधानी ढाका येथे त्यांच्या स्वागतासाठी हजारो BNP समर्थक रस्त्यावर उतरले होते.

तारीक रहमान यांचे ढाका विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. BNP समर्थकांनी विमानतळाकडे मोर्चा काढत ‘जय BNP’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पत्नी झुबैदा रहमान आणि कन्या झायमा रहमान यांच्यासह तारिक रहमान बांगलादेशात परतले आहेत. सुरक्षेच्या कारणाने त्यांनी बुलेटप्रूफ वाहनातून प्रवास केला. वाहनातून समर्थकांना अभिवादन करतानाचा त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तारीक रहमान प्रथम त्यांची आजारी आई खालिदा झिया यांची भेट घेणार असून, त्यानंतर गुलशन-२ येथील झिया कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाणार आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून खालिदा झिया यांची प्रकृती बिघडली आहे.

दरम्यान, आगामी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तारिक रहमान यांचे बांगलादेशात पुनरागमन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ६० वर्षीय तारिक रहमान हे आगामी निवडणुकीत पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

२०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या विद्यार्थी नेतृत्वाखालील हिंसक आंदोलनानंतर (जुलै उठाव) देशातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतात आश्रय घेतला होता. दरम्यान, BNP च्या २००१-२००६ च्या सत्ताकाळातील सहकारी असलेले जमात-ए-इस्लामी आणि त्यांचे इस्लामवादी घटक आता BNP साठीच प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी ठरले आहेत. अंतरिम सरकारने कडक दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अवामी लीग पक्ष बरखास्त केल्याने देशातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

तारीक रहमान कोण आहेत?

तारीक रहमान हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) कार्यकारी अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, तसेच देशात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरता, हिंसाचार आणि अंतरिम सरकारच्या भूमिकेवर होत असलेल्या वादांच्या दरम्यान त्यांचे स्वदेशात पुनरागमन झाले आहे.

बांगलादेशच्या राजकारणातील “क्राउन प्रिन्स” म्हणून त्यांची ओळख आहे. ते माजी राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान आणि तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या खालिदा झिया यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांच्या या राजकीय वारशामुळेच ते BNP मधील अत्यंत महत्त्वाची आणि केंद्रस्थानी असलेली व्यक्ती मानले जातात.

BNP ने १२ डिसेंबर रोजी तारिक रहमान यांच्या पुनरागमनाची अधिकृत घोषणा केली होती. २००८ पासून ते लंडनमध्ये वास्तव्यास होते आणि अनेक भ्रष्टाचार प्रकरणांमुळे त्यांनी देश सोडला होता.

logo
marathi.freepressjournal.in