

भारताच्या शेजारील बांगलादेशमध्ये आज सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी ५.७ रिश्टर तीव्रतेचा भुंकप आला. या भुंकपात ६ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दरम्यान कापड कारखान्यात चेंगराचेंगरी झाली असून या भुंकपाचे धक्के भारतातही काही ठिकाणी जाणवल्याचे समजते. ढाक्यात गोंधळ निर्माण झाला असून सुरू असलेला बांगलादेश–आयर्लंड क्रिकेट सामना तातडीने थांबवण्यात आला.
भुंकपाचे केंद्रबिंदू
बांगलादेशमधील नरसिंगडी जिल्ह्यातील माधाबादी हे भुंकपाचे केंद्रबिंदू असल्याने ढाक्यापासून अवघ्या २५ किलोमीटरवर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली. अनेक इमारती हलल्या असून एक दहा मजली इमारत झुकल्याचेही पाहायला मिळाले.
इतिहासात बांगलादेशाने यापूर्वीही मोठे भूकंप अनुभवले आहेत. १७६२ मधील ८.५ रिश्टर तीव्रतेचा ‘ग्रेट अराकान भूकंप’ हा बांगलादेशातील सर्वात विनाशकारी भुंकप ठरला होता.
कापड कारखान्यात चेंगराचेंगरी
गाझीपूर जिल्ह्यातील श्रीपूर परिसरात भूकंपादरम्यान मोठा अपघात घडला. भुंकपाचा धक्का बसताच डेनिमेक कापड कारखान्यातून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगारांमध्ये चेंगराचेंगरी झाली. कामगारांनी केलेल्या आरोपानुसार, अधिकाऱ्यांनी मुख्य गेट उघडण्यास नकार दिल्याने भीतीचे वातावरण पसरले आणि कामगार जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. यामध्ये १५० हून अधिक कामगार जखमी झाले. जखमींना श्रीपूर उपजिल्हा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
१० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
नारायणगंजच्या रूपगंज उपजिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली. भूकंपाचा धक्का बसताच घराबाहेर पळणाऱ्या आई-मुलीवर रस्त्याकाठची भिंत कोसळली. यामध्ये १० महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई बचावली.
कोलकात्यासह पूर्व भारतातही धक्के
बांगलादेशातील भूकंपाचे परिणाम भारतातही जाणवले. कोलकातामध्ये सुमारे २० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि नादिया जिल्ह्यांतील अनेक भागातही हलक्या धक्क्यांची नोंद झाली असून यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही.