बिग बॉस फेम अब्दु रोजिक पुन्हा अडचणीत? दुबई विमानतळावर पोलिसांनी घेतले होते ताब्यात, जाणून घ्या कारण

'बिग बॉस १६' मधून लोकप्रियता मिळवलेला ताजिकिस्तानचा गायक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अब्दु रोजिक हा शनिवारी (१२ जुलै) सकाळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतल्यामुळे चर्चेत आला.
बिग बॉस फेम अब्दु रोजिक पुन्हा अडचणीत? दुबई विमानतळावर पोलिसांनी घेतले होते ताब्यात, जाणून घ्या कारण
Published on

'बिग बॉस १६' मधून लोकप्रियता मिळवलेला ताजिकिस्तानचा गायक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अब्दु रोजिक हा शनिवारी (१२ जुलै) सकाळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतल्यामुळे चर्चेत आला.

चोरीच्या आरोपांशी संबंधित चौकशीसाठी त्याला स्थानिक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्याची सुटका करण्यात आल्याची माहिती अब्दुच्या मॅनेजमेंट टीमने दिली आहे.

अचानक चौकशी, तातडीने सुटका -

अब्दु रोजिक मॉन्टेनेग्रोहून दुबईत शनिवारी सकाळी ५ वाजता दाखल झाला, त्याच वेळी दुबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. खलीज टाइम्सशी बोलताना त्याच्या टीमने सांगितले की, “अब्दुला अटक झालेली नाही, त्याला फक्त चौकशीसाठी तात्पुरते ताब्यात घेण्यात आले होते. त्याने अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.”

सोहळ्याला हजेरी -

अब्दु रोजिकने ठरल्याप्रमाणे शनिवारी इंडिया इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. या विशेष कार्यक्रमासाठी त्याला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्याने उत्साहाने सहभाग घेतल्याचे दिसून आले.

कोण आहे अब्दु रोजिक -

अब्दु रोजिक हा गायक असून तो सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ आणि 'बिग बॉस १६' मधील सहभागामुळे प्रचंड लोकप्रिय झाला. त्याने ‘ओही दिली जोर’, ‘चकी चकी बोरॉन’ आणि ‘मदर’ यांसारखी गाणी गायली आहेत.

२०२२ मध्ये त्याला अबूधाबीतील २२व्या IIFA पुरस्कार समारंभात आमंत्रित करण्यात आलं होतं, जिथे त्याने ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हे हिंदी गाणं सादर केलं होतं.

तसंच, २०२४ मध्ये भारतातील एका हॉस्पिटॅलिटी फर्मविरोधातील मनी लॉन्डरिंग प्रकरणात रोजिकची ED कडून चौकशीही करण्यात आली होती. मात्र, त्याचं नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेलं नव्हतं, असंही खलीज टाइम्सने स्पष्ट केलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in