सिडनीतील प्रसिद्ध बॉन्डी बीचवर रविवारी (दि.१४) सायंकाळी हनुक्का या ज्यू धर्मीय सणाच्या प्रारंभानिमित्त आयोजित सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण गोळीबाराने संपूर्ण ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली आहे. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक वेळेनुसार सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावर शेकडो नागरिक उपस्थित असताना अचानक गोळीबार सुरू झाला. हल्लेखोरांनी गर्दीत अंदाधुंद गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या गोळीबारात लहान मुले आणि वृद्ध नागरिकही जखमी झाल्याची माहिती आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाल्याचे दिसून येत असून, जीव वाचवण्यासाठी लोक पळताना आणि काही जण जखमींना सीपीआर देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या घटनेदरम्यान सुमारे ५० ते ६० गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात एका हल्लेखोराचा मृत्यू झाला असून तोच गोळीबार करणाऱ्यांपैकी एक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरा संशयित हल्लेखोर गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर एका संशयित हल्लेखोराचा दावा करण्यात येणारा ड्रायव्हिंग लायसन्स व्हायरल झाला आहे. या परवान्यावर ‘नवीद अक्रम’ असे नाव असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दस्तऐवजाची सत्यता अधिकृतरीत्या तपासलेली नसून हल्लेखोराची ओळख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत, चुकीची माहिती शेअर करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
न्यू साउथ वेल्स (NSW) पोलिसांनी ‘एक्स’ वरील अधिकृत पोस्टमध्ये सांगितले की, “बॉन्डी बीचवर दोन व्यक्तींनी केलेल्या सार्वजनिक ठिकाणावरील गोळीबारानंतर पोलिसांची मोठी कारवाई सुरू आहे. आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका संशयित हल्लेखोराचाही समावेश आहे. दुसरा संशयित गंभीर अवस्थेत आहे.”
या घटनेत दोन पोलिस अधिकाऱ्यांसह एकूण ११ जण जखमी झाले आहेत. तपासासाठी नागरिकांनी मोबाईल फोन किंवा डॅशकॅममधील व्हिडीओ पोलिसांकडे जमा करावेत, तसेच निनावी माहिती देण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.