

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील प्रॉव्हिडन्स येथील ब्राउन विद्यापीठ परिसरात शनिवारी (दि.१३) रात्री झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याने परिसरात शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेची सध्या मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे.
प्रॉव्हिडन्स पोलिसांच्या उपप्रमुखाने सांगितले की, "संशयित काळ्या कपड्यांमध्ये असून त्याचा शोध घेण्यासाठी मॅनहंट सुरू आहे. लवकरच हल्लेखोराचा व्हिडीओ प्रसिद्ध केला जाणार असून, त्याची ओळख पटवण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाईल."
हा गोळीबार विद्यापीठातील एका इमारतीत झाला. गोळीबारानंतर आरोपी जवळच्या वसाहतींमध्ये पळून गेला. महापौर ब्रेट स्मायली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "संशयिताचा शोध सुरू असून परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही."
दरम्यान, सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संशयिताला ताब्यात घेतल्याचे सांगितले होते. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी एफबीआय (Federal Bureau of Investigation) घटनास्थळी असल्याचे आणि संशयित ताब्यात असल्याचे म्हटले होते. मात्र नंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत, सध्या कोणताही संशयित ताब्यात नसल्याचे स्पष्ट केले.
ब्राउन विद्यापीठानेही प्रथम संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याचा अलर्ट दिला होता. नंतर संशयित अजूनही फरार असल्याचे सांगण्यात आले.
विद्यापीठाचा तातडीचा अलर्ट
ब्राउन विद्यापीठाने ‘ब्राउनयूअलर्ट’द्वारे कॅम्पसमधील बारस आणि हॉली इंजिनिअरिंग इमारतीजवळ सक्रिय हल्लेखोर असल्याचा इशारा दिला होता. विद्यार्थ्यांना, कर्मचारी व उपस्थित नागरिकांना तात्काळ दरवाजे लॉक करण्याचे, मोबाईल सायलेंट ठेवण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी लपून राहण्याचे निर्देश देण्यात आले. ‘RUN, HIDE, FIGHT’ या सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार शक्य असल्यास सुरक्षितपणे परिसर सोडण्याचा, अन्यथा लपून राहण्याचा आणि शेवटचा पर्याय म्हणूनच प्रतिकार करण्याचा सल्ला देण्यात आला.
हल्लेखोराने काळा मास्क घातल्याचा दावा
विद्यापीठाने सांगितले की, “गोळीबारातील अनेक जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या माहिती देणे शक्य नाही.” तसेच, घटनेच्या वेळी कोणकोण उपस्थित होते, याची माहिती गोळा केली जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. घटनेच्या वेळी बारस आणि हॉली इंजिनिअरिंग इमारतीत अनेक परीक्षा सुरू असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून, प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोराने काळा मास्क घातल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांनी अजून त्याची ओळख जाहीर केली नाही. पोलिसांनी नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत या परिसरात न येण्याचे आवाहन केले आहे. घटनेचा तपास सुरू असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.