कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

आतापर्यंत ८६ इमारती कोसळल्या असून, सात विमानतळांवरील कामकाजही स्थगित करण्यात आले आहे.
कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video
कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video(Photo - X)
Published on

कोलंबिया : कोलंबियाला सोमवारी (दि. १०) सकाळी ७.४ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भीषण भूकंपात आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू, तर ५७० जण जखमी झाले आहेत. रिसालदा विभागाला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला असून, अनेक इमारती कोसळल्याने ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकांकडून शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून, आणखी धक्क्यांची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परेरामध्ये मोठी जीवितहानी

कोलंबियन असोसिएशन ऑफ कॅपिटल सिटीजच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर भूकंपातील जीवितहानीची माहिती समोर आली. देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत ८६ इमारती कोसळल्या असून, सात विमानतळांवरील कामकाजही स्थगित करण्यात आले आहे.

सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेले परेरा शहर भूकंपाच्या केंद्रापासून ६४ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. त्यामुळे या शहराला भूकंपाचा मोठा फटका बसला. अनेक भागांत इमारतींचे नुकसान झाले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हजारो इमारतींचे नुकसान

राष्ट्राध्यक्ष अबेलार्दो दे ला एस्प्रिएला यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे देशभरातील १,५७७ निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यापैकी ३७ इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ६० हून अधिक इमारती कोसळल्या असून, १८ आरोग्य केंद्रे आणि ५२ शाळांनाही मोठा फटका बसला आहे.

राजधानी बोगोटासह देशातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. बोगोटामध्ये धोक्याचे अलार्म वाजल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक इमारतींमधील नागरिक बाहेर पडून रस्त्यावर आले.

भूकंपाचे केंद्र चोको भागात

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने स्थानिक वेळेनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ७.३४ वाजता भूकंपाची नोंद केली. भूकंपाचे केंद्र चोको भागातील सॅन जोस देल पाल्मारजवळ असल्याचे सांगण्यात आले. हे ठिकाण राजधानी बोगोटापासून सुमारे २८० किलोमीटर पश्चिमेला आहे. भूकंपाची खोली सुमारे १०७ किलोमीटर होती.

चोको भागाच्या गव्हर्नर नुबिया कॅरोलिना कॉर्डोबा कुरी यांनी क्विब्दो शहरात काही जण जखमी झाल्याचे सांगितले. तसेच अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. भूकंपानंतर आणखी धक्के बसण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे.

राष्ट्राध्यक्षांकडून मदतीचे आश्वासन

भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी आपत्कालीन समितीची बैठक बोलावली आहे. भूकंपग्रस्तांच्या संरक्षणासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मदत आणि बचावकार्याचे वैयक्तिकरित्या नेतृत्व करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बोगोटातून मदतीचा हात

बोगोटाचे महापौर कार्लोस एफ. गालान यांनी भूकंपग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यासाठी शहरात सहा संकलन केंद्रे सुरू करण्याची घोषणा केली आहे. पिण्याचे पाणी, ब्लँकेट, अन्नपदार्थ, वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू आणि प्रथमोपचार साहित्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बोगोटातील सुमारे १०० बचाव कर्मचाऱ्यांना सर्वाधिक बाधित भागांमध्ये पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे. हे पथक शोध आणि बचाव कार्यात स्थानिक यंत्रणांना मदत करणार आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा आणि जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in