डोनाल्ड ट्रम्प नरमले; भारताशी व्यापार करण्याची तयारी; मोदींनीही दिला प्रतिसाद

भारत-अमेरिका टॅरिफ तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून भारताशी व्यापार चर्चेसाठी सकारात्मकता दर्शवली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले चांगले मित्र म्हटले. त्यानंतर मोदींनीही ट्रम्प यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत एक्सवर पोस्ट केली.
डोनाल्ड ट्रम्प नरमले; भारताशी व्यापार करण्याची तयारी; मोदींनीही दिला प्रतिसाद
@narendramodi
Published on

वॉशिंग्टन : टॅरिफ युद्धावरून भारत आणि अमेरिकेत निर्माण झालेल्या कमालीच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेत बुधवारी पहाटे सोशल मीडिया पोस्टमधून भारताशी पुन्हा एकदा व्यापाराची चर्चा आणि वाटाघाटी करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचेही ते म्हणाले. या पोस्टनंतर आता मोदी यांनीही ट्रम्प यांच्या सकारात्मकतेला प्रतिसाद देत एक्सवर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांच्या विधानाचे स्वागत केले आहे. तसेच दोन्ही देशांचे पथक लवकरच व्यापार करारासंदर्भात चर्चा करेल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

शिष्टमंडळ अमेरिकेला जाणार

भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित ट्रेड डीलवर सकारात्मक प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. ट्रम्प आणि मोदी यांनी संबंधित देशांच्या अधिकाऱ्यांना येत्या आठवड्यात चर्चा यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रम्प यांच्या विधानानंतर पुढील आठवड्यात भारतातील एक व्यापार शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना होण्याची शक्यता आहे. ही टीम व्यापारातील अडथळ्यांवर चर्चा करेल आणि दोन्ही देशांसाठी योग्य परिस्थिती निर्माण करणारा करार सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

येत्या आठवड्यात चर्चा

भारत-अमेरिका व्यापार करार वाटाघाटी आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी म्हटले आहे की, वॉशिंग्टन आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेल्या चर्चा लवकरच चांगल्या निष्कर्षापर्यंत पोहोचतील असा त्यांना विश्वास आहे. ट्रम्प म्हणाले की, येत्या आठवड्यात ते सर्व प्रकारचे व्यापार अडथळे दूर करण्यासाठी मोदींशी चर्चा करू.येत्या काही आठवड्यात माझे खूप चांगले मित्र, मोदी यांच्याशी बोलण्यास मी उत्सुक आहे. मला विश्वास आहे की दोन्ही महान देशांसाठी यशस्वी निकालापर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

नैसर्गिक भागीदार

मोदींनीही एका पोस्टमध्ये लिहिले की, भारत आणि अमेरिका चांगले मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत. मला विश्वास आहे की आमच्या व्यापार वाटाघाटी भारत-अमेरिका भागीदारीसाठी अमर्याद शक्यता उघडतील. आमच्या टीम या चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. मी ट्रम्प यांच्याशी बोलण्यासही उत्सुक आहे. एकत्रितपणे आपण दोन्ही देशांच्या लोकांसाठी एक चांगले आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करू.

logo
marathi.freepressjournal.in