

वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याच्या आपल्या योजनेचा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरचा आपला अजेंडा जाहीर केला. अमेरिकेच्या राज्यघटनेच्या १४ व्या घटनादुरुस्तीनुसार, अमेरिकेत जन्माला आलेल्या कोणत्याही बालकाला त्याचा जन्म होताच अमेरिकन नागरिकत्व मिळते. भले त्याच्या पालकांकडे अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व असू द्या. मात्र, ट्रम्प आता राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच हा अधिकार काढून टाकणार आहेत. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर फेडरल रिझर्व्हचे (सेंट्रल बँक) चेअरमन जेरोम पॉवेल यांना पायउतार होण्यास सांगणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कॅपिटल हिल प्रकरणातील दोषींना माफ करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ट्रम्प २०२० मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, ६ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या काही समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये (अमेरिकन संसद) प्रवेश केला आणि लुटमार केली होती.
नाटो सोडण्याचा विचार
मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी नाटोबद्दलही भाष्य केले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते यातून माघार घेण्याचा गांभीर्याने विचार करणार असून, गर्भपाताच्या गोळ्यांवर बंदी घालणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.