किंग चार्ल्स तिसरे यांच्यावर अंडी फेकली

उत्तर इंग्लंड येथे दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी आल्या असताना हा प्रकार घडला
किंग चार्ल्स तिसरे यांच्यावर अंडी फेकली

यॉर्कशायरमध्ये ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे आणि त्यांची पत्नी क्वीन कॉन्सॉर्ट कॅमिला यांच्यावर अंडी फेकण्यात आली. हे कृत्य करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. राजे आणि त्यांच्या पत्नी कॅमिला या यॉर्कशायर, उत्तर इंग्लंड येथे दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी आल्या असताना हा प्रकार घडला आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राजा आणि राणी मिकलेगेट बारमध्ये (यॉर्कशायरचे पारंपरिक शाही प्रवेशद्वार) लोकांशी बोलत होते. राजाचे स्वागत करण्यासाठी लोक ‘गॉड सेव्ह द किंग’ गात असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर अंडी फेकली. ही अंडी चार्ल्स तिसरे यांना लागली नाहीत. त्यानंतर राजाने या घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही आणि लोकांना भेटणे सुरू ठेवले.

मी गुलामगिरी, वसाहतवाद आणि साम्राज्यवादाच्या बळींसोबत आहे. न्यायासाठी ही अंडी फेकण्यात आली. किंग चार्ल्स यांना राजा बनवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना न्याय मिळावा, अशी माझी इच्छा असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

अंडी फेकणाऱ्या व्यक्तीचे नाव पॅट्रिक थेलवेल आहे. तो डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता असून स्थानिक निवडणुकीत ग्रीन पार्टीचा उमेदवार आहे. पॅट्रिक हा युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क गार्डनिंग सोसायटीचा अध्यक्षही राहिलेला आहेत. तो ब्लॉगवर हवामान बदलाबद्दल लिहीत असतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in