

नवी दिल्ली : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात बुधवारी (दि. ३०) हवेतच थरारक घटना घडली. विमान ३४ हजार फूट उंचीवर असताना सहवैमानिकाने भारतीय आणि मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला करून विमानाचे नियंत्रण ताब्यात घेण्याचा आणि ते क्रॅश करण्याचा कथित प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतरही कॅप्टन मच्छार यांनी प्रसंगावधान राखत कॉकपिटचा दरवाजा उघडण्यास मदत केली. यादरम्यान विमानाची उंची काही क्षणांत सुमारे १४ हजार फूटांनी घसरली. त्यानंतर प्रवासी आणि क्रू सदस्यांनी सहवैमानिकाला पकडले, तर विमानातील इतर वैमानिकांनी नियंत्रण मिळवत ते सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षित उतरवले. विमानातील १७४ प्रवासी सुरक्षित बचावले असून, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे.
३४ हजार फुटांवर थरार
माहितीनुसार, फ्लायदुबईचे FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होते. विमानात १७४ प्रवासी होते. त्यामध्ये २७ मुलांचाही समावेश होता. विमान ३४ हजार फूट उंचीवर असताना कॉकपिटमध्ये कॅप्टन मच्छार आणि सहवैमानिकामध्ये झटापट सुरू झाली.
इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सहवैमानिकाने कॅप्टन मच्छार यांच्यावर हल्ला केला आणि विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेदरम्यान विमानाची उंची झपाट्याने कमी झाली. फ्लाइट-ट्रॅकिंग डेटानुसार विमानाने सुमारे १४ हजार फूट उंची अवघ्या ३७ सेकंदांत कमी झाली. त्यानंतर, विमानाने आपत्कालीन हस्तक्षेपाचा ट्रान्सपोंडर कोडही प्रसारित केला.
गंभीर जखमी झाल्यानंतरही मच्छार यांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. कॉकपिटचा दरवाजा उघडल्यानंतर प्रवासी आणि क्रू सदस्यांना आत प्रवेश करता आला. यानंतर प्रवाशांनी आणि विमानात प्रवासी म्हणून असलेल्या फ्लायदुबईच्या इतर वैमानिकांनी सहवैमानिकाला ताब्यात घेतले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमानाचे नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर मूळ गंतव्य असलेल्या तेल अवीवऐवजी विमान सौदी अरेबियातील तबूक विमानतळाकडे वळवण्यात आले आणि तेथे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
सौदीतील रुग्णालयात उपचार
तबूक विमानतळावर उतरल्यानंतर कॅप्टन मच्छार आणि सहवैमानिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मच्छार यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. भारतीय दूतावासाकडूनही त्यांना आवश्यक मदत केली जात आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि कॉकपिटमध्ये नेमका काय घटनाक्रम घडला, याचा तपास सुरू आहे.
मोदींकडून कुटुंबीयांशी फोनवरून संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पत्नी तसेच आई-वडिलांशी फोनवरून संवाद साधला. मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक करताना त्यांच्या शौर्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचल्याचे मोदी यांनी सांगितले. सौदी अरेबियातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मच्छार यांना भारतीय दूतावासाकडून सर्वतोपरी मदत केली जात असल्याची माहितीही त्यांनी कुटुंबीयांना दिली.
मोदी यांनी सोशल मीडियावर मच्छार यांना 'हिरो' संबोधले आहे. गंभीर जखमी असूनही त्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
नेतान्याहूंकडूनही कौतुक
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही कॅप्टन मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक केले. गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी प्रतिकार केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडण्यास मदत केली. त्यामुळे प्रवासी आणि क्रू सदस्यांना हल्लेखोराला आटोक्यात आणण्याची संधी मिळाली, असे नेतन्याहू यांनी म्हटले.
मच्छार यांच्या कृतीमुळे विमानातील इस्रायली नागरिकांसह सर्व १७४ जणांचे प्राण वाचल्याचेही त्यांनी नमूद केले. या घटनेत हस्तक्षेप करणाऱ्या प्रवासी आणि क्रू सदस्यांचेही त्यांनी कौतुक केले.
९,७५० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव
कॅप्टन स्मित मच्छार हे अनुभवी भारतीय वैमानिक आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे निवासस्थान असणारे स्मित मच्छार हे जून २०२२ पासून फ्लायदुबईच्या बोईंग ७३७ ताफ्यात कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी स्पाइसजेटमध्ये सुमारे ११ वर्षे काम केले असून, त्यांच्या प्रोफाइलनुसार बोईंग ७३७ विमानांवर त्यांचा ९,७५० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.
क्रिकेटपटूंकडूनही शौर्याला सलाम
कॅप्टन मच्छार यांच्या धाडसाचे क्रीडा क्षेत्रातूनही कौतुक होत आहे. माजी क्रिकेटपटू शिखर धवन, सुरेश रैना आणि आकाश चोप्रा यांनी मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
गंभीर परिस्थितीतही त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगत या क्रिकेटपटूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या घटनेनंतर विमानातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवाशांना विमानात धारदार वस्तू नेण्यास कडक निर्बंध असताना कथित हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र विमानात आले तरी कसे, याचा तपास केला जात आहे. हे शस्त्र नेमके चाकू होते की विमानात आधीपासून उपलब्ध असलेली अन्य वस्तू, याबाबतही अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा तपासणी, कॉकपिटमधील वस्तूंची उपलब्धता आणि क्रूच्या सुरक्षा प्रक्रियांचाही तपासाचा भाग असणार आहे.
दरम्यान, या घटनेनंतर इस्रायलने विमान सुरक्षेच्या दृष्टीने पायलट तपासणी अधिक कडक करण्याची घोषणा केली आहे. सहवैमानिकाने केलेल्या कथित हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, इस्रायली अधिकाऱ्यांनी सहवैमानिकाने विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला असावा, असा आरोप केला जात आहे. मात्र फ्लायदुबईने घटनेच्या मूळ कारणांबाबत घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत, असे म्हटले आहे. सौदी अरेबियात सहवैमानिकाची चौकशी सुरू असल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.