"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव

कॅनडातील एडमंटन शहरातील एका रुग्णालयात भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या त्यांच्या पत्नीचा अनुभव सांगणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव
"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव
Published on

कॅनडातील एडमंटन शहरातील एका रुग्णालयात भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल ८ तासांपेक्षा जास्त वेळ इमर्जन्सी रूममध्ये या रुग्णाला ताटकळत ठेवण्यात आले होते. छातीत दुखत असल्याचे वारंवार सांगूनही वेळेत उपचार न मिळाल्याने हा मृत्यू झाल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ग्लोबल न्यूजच्या वृत्तानुसार, ही घटना ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये घडली. प्रशांत श्रीकुमार असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ४४ वर्षांचे होते. प्रशांत हे अकाउंटंट या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांचे वडील, पत्नी आणि तीन मुले आहेत. त्यांच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

कामावर असताना प्रशांत यांच्या छातीत अचानक दुखू लागले. एका क्लायंटने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. चेकअप केल्यानंतर त्यांना आपत्कालीन विभागात थोडा वेळ थांबायला सांगितले. मात्र, अनेक तास उलटूनही डॉक्टरांनी त्यांना तपासलं नाही, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

त्याचा बीपी सतत वाढत होता...

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रशांत यांच्या पत्नी निहारिका यांनी घडलेला प्रसंग सांगितला आहे. प्रशांत श्रीकुमार यांनी सोमवारी (दि. २२) दुपारी १२ वाजता तीव्र छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यांना दुपारी १२.२० वाजता ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. "तो १२.२० पासून रात्री ८.५० पर्यंत ट्रायजमध्ये बसला होता. तो सतत छातीत दुखत असल्याची तक्रार करत होता. त्याचा बीपी सतत वाढत राहिला, शेवटचा बीपी २१० इतका होता," असं त्यांनी सांगितले. तीव्र आणि असह्य वेदना होत असल्याचे सांगूनही त्यांना केवळ टायलेनॉल नावाची वेदनाशामक गोळी देण्यात आली. हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या पत्नीला असभ्य म्हटले. यावरही प्रशांत यांच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे.

‘मला वेदना सहन होत नाहीत’

प्रशांत यांचे वडील कुमार श्रीकुमार यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा सतत असह्य वेदनांची तक्रार करत होता. “तो मला आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना म्हणत होता, "पप्पा, मला वेदना सहन होत नाहीत,” असे कुमार श्रीकुमार यांनी सांगितले.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रशांत यांचा ईसीजी (ECG) काढण्यात आला होता. मात्र त्यात काही गंभीर आढळले नाही, असे सांगून त्यांना पुन्हा प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. दरम्यान, नर्स अधूनमधून रक्तदाब तपासत होत्या, मात्र तो सतत वाढतच असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

तब्बल ८ तासांनंतर जेव्हा प्रशांत यांना अखेर उपचार कक्षात बोलावण्यात आले, तेव्हा काही सेकंदांतच ते कोसळले. कार्डियाक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाल्याचे नंतर सांगण्यात आले.

कुटुंबीयांचे मित्र वरिंदर भुल्लर यांनी या घटनेला धक्कादायक म्हटले आहे. “हा तोटा खूप मोठा आहे. रुग्णालय आणि आरोग्य व्यवस्थेकडून आम्हाला यापेक्षा चांगली अपेक्षा होती,” असे ते म्हणाले.

मृताच्या कुटुंबीयांप्रती संवेदना

दरम्यान, ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटल हे कोव्हनंट हेल्थ या संस्थेच्या अंतर्गत चालवले जाते. गोपनीयतेच्या कारणास्तव प्रकरणाच्या तपशीलावर भाष्य करता येणार नसल्याचे सांगत, संस्थेने हे प्रकरण चीफ मेडिकल एक्झामिनर कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच मृताच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

“रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता व काळजी हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही कुटुंबीय आणि मित्रांप्रती मनापासून सहवेदना व्यक्त करतो,” असे कोव्हनंट हेल्थने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या घटनेकडे पाहता, कॅनडात भारतीय वंशाच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. एकीकडे विद्यार्थ्याची हत्या तर दुसरीकडे हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे गमावलेला जीव, यामुळे भारतीय नागरिक खरंच कॅनडात सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in