नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अपार्टमेंटमधून मारली होती उडी

दसऱ्याच्या सुट्टीत भारतात न येता, तो संक्रांतीसाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घरी येणार होता. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र...
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अपार्टमेंटमधून मारली होती उडी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अपार्टमेंटमधून मारली होती उडी
Published on

बर्लिन : जर्मनीमध्ये नववर्षाच्या रात्री लागलेल्या भीषण आगीतून बचाव करण्यासाठी अपार्टमेंटमधून उडी मारलेल्या २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव हृतिक रेड्डी असून तो तेलंगणातील जनगांव जिल्ह्यातील मलकापूर गावाचा रहिवासी होता.

माहितीनुसार, बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री जर्मनीची राजधानी बर्लिनजवळील ब्रँडनबर्ग येथे हृतिक रेड्डी राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये अचानक मोठी आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. आगीचे लोळ आणि धुराचे लोट वाढत गेल्यानंतर जीव वाचवण्यासाठी हृतिकने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. खाली पडताना त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

संक्रांतीसाठी येणार होता घरी

दसऱ्याच्या सुट्टीत भारतात न येता, तो संक्रांतीसाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घरी येणार होता. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र या दुर्दैवी घटनेची माहिती हृतिकच्या कुटुंबाला देण्यात आल्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक रेड्डी जून २०२३ मध्ये जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथे गेला होता. तो पोट्सडॅम येथील युनिव्हर्सिटी ऑफ युरोप फॉर अप्लाइड सायन्सेस येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. याआधी त्याने २०२२ मध्ये वाग्देवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली होती.

जर्मनीत तपास सुरू, कुटुंबियांची MEA कडे विनंती

आग कशी लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. जर्मनीतील स्थानिक प्रशासनाने आगीच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, हृतिकच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि जर्मनीतील भारतीय दूतावासाकडे मृतदेह भारतात परत आणण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या कार अपघातात तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील कडियाला भावना आणि पी. मेघना राणी या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. याशिवाय, अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील अल्बनी येथे एका घराला लागलेल्या आगीत जनगांव जिल्ह्यातील २४ वर्षीय सहज रेड्डी उडुमला हिचाही मृत्यू झाला होता.

या घटनांमुळे परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in