

तेहरान : अमेरिकेने इराणवर जमिनीवरून आक्रमण केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ७० लाख इराणी नागरिक शस्त्र उचलण्यास तयार आहेत, असा दावा इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालीबफ यांनी गुरुवारी केला.
कालीबफ यांची ओळख अमेरिकेसोबत चर्चा करू शकणारे एक संभाव्य मध्यस्थ म्हणून आहे. मात्र, युद्ध सुरू झाल्यापासून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकेला सातत्याने आव्हाने दिली आहेत.
लष्कर भरतीचे प्रयत्न
इराणची एकूण लोकसंख्या साधारण ९ कोटी आहे. या संदर्भात इतक्या मोठ्या आकड्याचा उल्लेख करणारे कालीबफ हे पहिले उच्चपदस्थ अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा आकडा सोशल मीडियावर चर्चेत आहे, मात्र तो नेमका कुठून आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुलांचाही समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील सरकारी प्रसारमाध्यमे आणि एसएमएस मोहिमेद्वारे लोकांना स्वयंसेवक म्हणून सामील होण्याचे आवाहन केले जात आहे. सरकारने निवृत्त सैनिकांनाही युद्धासाठी रस दाखवण्याचे आवाहन केले असून, रिव्होल्युशनरी गार्डच्या 'बसिज' या स्वयंसेवक दलात १२ वर्षांच्या मुलांचाही समावेश करण्यास सुरुवात केली आहे.
काय म्हणाले कालीबफ?
त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, गेल्या एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत, संपूर्ण देशात एक शक्तिशाली राष्ट्रीय मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे सुमारे ७० लाख इराणी नागरिकांनी स्वतःहून पुढे येत देशाच्या रक्षणासाठी शस्त्रे उचलण्याची तयारी दर्शवली आहे.