
इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’अंतर्गत गेल्या आठवड्यात इराणच्या आण्विक व लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्यापासून दोन्ही देशांमधील संघर्ष कमालीचा वाढला असून एकमेकांवर जोरदार मिसाईल हल्ले सुरू आहेत. अशातच इराणच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
जर इस्रायलने इराणवर अणुहल्ला केला तर पाकिस्तान देखील इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल, असे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य जनरल मोहसेन रेझाय म्हणाले. "पाकिस्तानने आम्हाला सांगितले आहे की जर इस्रायलने अण्वस्त्रांचा वापर केला तर आम्ही त्यांच्यावर अण्वस्त्रांनी हल्ला करू", असे रेझाय यांनी इराणमधील एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
पाकिस्तानचे स्पष्टीकरण -
दुसरीकडे, पाकिस्तानने रेझाय यांनी केलेला दावा फेटाळला आहे. पाकिस्तानने असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी सांगितले. तसेच, आमची अणुक्षमता ही केवळ शत्रूंविरुद्ध आमच्या देशाच्या संरक्षणासाठी आणि आमच्या जनतेच्या हितासाठी आहे, असे आसिफ यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले. तथापि, त्यांनी पश्चिमेकडील देशांना इस्त्रायलला आवर घालण्याची गरज असल्याचेही नमूद केले. इस्रायलसारख्या राष्ट्राला दिलेले पाठबळ विनाशकारी परिणाम घडवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इस्रायलचा आक्रमकपणा चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पाकिस्तानने अणुहल्ल्याचा दावा फेटाळला असला तरी त्यांनी इस्त्रायलविरुद्धच्या संघर्षात इराणला खुला पाठिंबा दिला आहे. तेहरानवरील हल्ल्यानंतर पाकने इराणच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन देताना इस्त्रायलविरोधात मुस्लिम देशांनी ऐक्य दाखवण्याची गरज असल्याचे आवाहन केले होते.