शस्त्रसंधीनंतरही इस्रायलचे हल्ले सुरूच; लेबनॉनमध्ये पाच जणांचा मृत्यू

मध्यरात्रीनंतर आणि शनिवारी सकाळपर्यंत दक्षिण लेबनॉनमधील अनेक ठिकाणी इस्रायली हवाई हल्ले करण्यात आले. यातील अनेक हल्ले...
शस्त्रसंधीनंतरही इस्रायलचे हल्ले सुरूच; लेबनॉनमध्ये पाच जणांचा मृत्यू
शस्त्रसंधीनंतरही इस्रायलचे हल्ले सुरूच; लेबनॉनमध्ये पाच जणांचा मृत्यू(Photo-X)
Published on

लेबनॉन : इस्रायल आणि इराण यांच्यात नव्या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती लेबनॉनच्या अधिकृत माध्यमांनी शनिवारी (दि. २०) दिली.

सरकारी वृत्तसंस्था नॅशनल न्यूज एजन्सी (NNA) ने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर आणि शनिवारी सकाळपर्यंत दक्षिण लेबनॉनमधील अनेक ठिकाणी इस्रायली हवाई हल्ले करण्यात आले. यातील अनेक हल्ले नबातियेह परिसरात आणि त्याच्या आसपास करण्यात आले.

हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू

एनएनएने नबातियेह शहर आणि त्याच्या उपनगरांवर इस्रायली तोफगोळ्यांचाही मारा झाल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. एनएनएनुसार, अरब सलीम या शहरावर झालेल्या हवाई हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर देइर जहरानी येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच द्वेइर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ शत्रूच्या ड्रोनने मोटारसायकलवर हल्ला केल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

अमेरिका-कतारच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी

शुक्रवारी एका अमेरिकी अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले की, अमेरिका आणि कतारच्या मध्यस्थांनी इस्रायल व इराणशी चर्चा करून इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात तातडीची शस्त्रसंधी घडवून आणली आहे. एका आखाती देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यानेही या शस्त्रसंधीची पुष्टी केली.

शस्त्रसंधीबाबत इस्रायलची भूमिका

अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत यांनी सांगितले की, हिजबुल्लाहने शस्त्रसंधीचे पालन केल्यास इस्रायलदेखील त्याचे पालन करेल. मात्र, यापूर्वी जाहीर झालेल्या शस्त्रसंधींनंतरही दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच राहिल्याचे पाहायला मिळाले आहे.

अमेरिका-इराण करारावरही परिणाम?

ही घोषणा अशा वेळी करण्यात आली, जेव्हा लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, देशाच्या दक्षिण आणि पूर्व भागांवरील इस्रायली हवाई हल्ले आणि तोफगोळाबारीत ४७ जणांचा मृत्यू झाला. या आठवड्यात वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात व्यापक मध्यपूर्व युद्ध थांबवण्यासाठी झालेल्या करारानंतरचा हा सर्वात हिंसक दिवस ठरला.

या करारामुळे लेबनॉनमधील इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्षही थांबण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, दक्षिण लेबनॉनमधील सुरू असलेल्या इस्रायली लष्करी कारवाईमुळे परिस्थिती पुन्हा चिघळताना दिसत आहे. इराणने इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून माघार घ्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सुरक्षा कारणास्तव सैन्य तेथेच तैनात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या ६० दिवसांच्या अंतरिम कराराच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इस्रायलचा दावा, हिजबुल्लाहवर कारवाई सुरूच

इस्रायलच्या लष्कराने शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला असून लेबनॉनमध्ये १५० हून अधिक हल्ले करण्यात आले. या कारवाईत २० पेक्षा हिजबुल्लाह दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला.

शुक्रवारीच लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आउन यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा करताना इस्रायलसोबतच्या चर्चांना पुढे नेण्यासाठी सर्वसमावेशक शस्त्रसंधी आवश्यक असल्याचे सांगितले.

चर्चेची पुढील फेरी मंगळवारी

अमेरिकेच्या दबावानंतर लेबनॉनने एप्रिलमध्ये वॉशिंग्टनमध्ये इस्रायलसोबत थेट चर्चा सुरू केली होती. या चर्चांचा उद्देश संघर्ष संपवणे आणि इस्रायल-हिजबुल्लाह संघर्षाला व्यापक प्रादेशिक युद्धापासून वेगळे ठेवणे हा होता. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानुसार, चर्चेची पाचवी फेरी मंगळवारी सुरू होणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक अमेरिकी अधिकाऱ्यांनी लेबनॉनमधील इस्रायलच्या मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, 'आवश्यकता असेपर्यंत' इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये तैनात राहील.

मार्चच्या सुरुवातीला हिजबुल्लाहने अमेरिकन-इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले होते. त्यानंतर इस्रायलने मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले आणि भू-आक्रमण सुरू केले.

logo
marathi.freepressjournal.in