

जपान : सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडीओ करत असताना एका १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जपानमध्ये घडली आहे. रुका असं या मुलीचं नाव असून, ती टिकटॉकवर लाइव्ह करत होती. यावेळी अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील बाल्कनीच्या कठड्यावर बसलेली असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या घटनेमुळे तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
लाइव्ह सुरू असतानाच तोल गेला
समोर आलेल्या माहितीनुसार, रुका ही १४ वर्षीय शाळकरी मुलगी होती. ती अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील बाल्कनीत बसून टिकटॉकवर लाइव्ह करत होती. यावेळी ती बाल्कनीच्या कठड्यावर बसली होती. अचानक तिचा तोल गेल्याने ती मागच्या बाजूला झुकली. खाली पडू नये म्हणून तिने काही क्षण कठडा पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची पकड सुटली आणि ती सहाव्या मजल्यावरून खाली पडली. हा प्रकार लाइव्ह व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.
लाइव्हदरम्यान मुलगी काय म्हणाली होती?
हॅबरलरने दिलेल्या वृत्तानुसार, लाइव्ह पाहणाऱ्या काही व्यक्तींनी रुका त्या वेळी "मला भूक लागली आहे", "मला भीती वाटते" आणि "हे धोकादायक आहे", अशी वाक्यं बोलल्याचं सांगितलं आहे. या घटनेनंतर लाइव्ह प्रसारण अचानक बंद झालं. संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर तिच्या मित्रमैत्रिणींना आणि फॉलोअर्सना मोठा धक्का बसला.
घटनेचा व्हिडिओ पाहा
डोक्याला गंभीर दुखापत; मृत्यू झाल्याचं वृत्त
सहाव्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे रुकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तिच्या ओळखीच्या काही व्यक्तींनी ती अलीकडच्या काळात वैयक्तिक अडचणी आणि मानसिक तणावातून जात असल्याचे दावेही केले आहेत. मात्र, या दाव्यांचा घटनेशी संबंध असल्याचं स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, उपलब्ध वृत्तांनुसार या घटनेचा तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, घटनेचं नेमकं कारण आणि परिस्थिती याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.