जपानमध्ये १ लाख वृद्धांनी ओलांडली शंभरी; सलग ५५ व्या वर्षी केला विक्रम

जपानमध्ये एक लाख वृद्धांनी शंभरी ओलांडली असून सलग ५५ व्या वर्षी जपानने हा विक्रम केला आहे. यामुळे जपान हा जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश बनला आहे. शंभरी गाठलेल्या वृद्धांमध्ये ८८ टक्के महिला आहेत.
जपानमध्ये १ लाख वृद्धांनी ओलांडली शंभरी; सलग ५५ व्या वर्षी केला विक्रम
Published on

कियो : जपानमध्ये एक लाख वृद्धांनी शंभरी ओलांडली असून सलग ५५ व्या वर्षी जपानने हा विक्रम केला आहे. यामुळे जपान हा जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश बनला आहे. शंभरी गाठलेल्या वृद्धांमध्ये ८८ टक्के महिला आहेत.

जपानच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जपानने सलग ५५ व्या वर्षी हा विक्रम केला आहे. येथील लोक सर्वात जास्त काळ जगतात. येथे ८७,७८४ महिला आणि ११,९७९ पुरुष १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. हे प्रमाण देशाच्या एकूण १२.४ कोटी लोकसंख्येच्या ०.८१ टक्के आहे.

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या तीन दिवस आधी हे आकडे जाहीर करण्यात आले. जपानमध्ये १५ सप्टेंबर रोजी ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा केला जातो. या दिवशी, जपानी पंतप्रधान १०० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अभिनंदन पत्र आणि चांदीचा ग्लास देतात. यावेळी, ५२,३१० ज्येष्ठ नागरिकांना हा सन्मान देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री ताकामारो फुकुओका यांनी दिली.

देशातील सर्वात वयस्कर महिला शिगेको कागावा यांचे वय ११४ वर्षे आहे आणि सर्वात वयस्कर पुरूष कियोताका मिझुनो हे १११ वर्षांचे आहेत. जीवनशैलीतील बदलामुळे जपानमध्ये हा चमत्कार घडला आहे. जपानमधील लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या कमी आहे. त्यामुळे लोकांना हृदयरोग आणि कर्करोगासारखे आजार कमी होतात.

आयुर्मानात जपान चौथ्या क्रमांकावर

जपानमधील आयुर्मान ९५.१ आहे, म्हणजेच येथील लोकांचे सरासरी वय ९५ वर्षे आहे. ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू २०२४’च्या आकडेवारीनुसार, जगातील ज्या देशांमध्ये लोकांचे सरासरी वय सर्वाधिक आहे, त्यामध्ये जपान चौथ्या स्थानावर आहे. या जपानमध्ये महिला पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात.

निरोगी देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी

जगातील सर्वात निरोगी देशांमध्ये जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. हा अहवाल आयुर्मान, लठ्ठपणा, मधुमेह, आनंद आणि आरोग्यावरील खर्चाच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in