अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अमेरिकेतील ओहायो येथील त्यांच्या घरी सोमवारी (दि.५) तोडफोड झाली असून या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
ही घटना सिनसिनाटी शहरातील ईस्ट वॉलनट हिल्स परिसरातील विल्यम हॉवर्ड टाफ्ट ड्राइव्हवरील व्हान्स यांच्या घरात घडली. घटनेच्या वेळी उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि त्यांचे कुटुंबीय घरात नव्हते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या एका अधिकाऱ्याने रात्री सव्वा बाराच्या सुमारास घराजवळ एक व्यक्तीला धावताना पाहिले. त्यानंतर त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता घराच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या व्यक्तीची ओळख किंवा या तोडफोडीमागील हेतू अद्याप जाहीर केलेले नाहीत. तसेच, संशयित व्यक्ती उपराष्ट्राध्यक्षांच्या घरामध्ये प्रवेश करू शकली नाही, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
उपराष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसकडून या घटनेवर कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नाही. तर या गंभीर सुरक्षाभंगाच्या घटनेचा तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.