

लंडन : ब्रिटनचे राजघराणे जगातील सर्वात जुने, श्रीमंत आणि लोकप्रिय राजघराणे असून या राजघराण्यातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनी भाऊ प्रिन्स अँड्रू यांची राजघराण्यातून हकालपट्टी केली असून त्यांची राजकुमार ही पदवीही काढून घेतली आहे. तसेच बकिंगहॅम पॅलेसमधून त्यांना बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांचे भाऊ प्रिन्स अँड्रू यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, ते त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व शाही पदव्या सोडणार आहेत. प्रिन्स अँड्रू यांनी एका निवेदनात म्हटले होते की ते आता ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ यासारख्या पदव्या वापरणार नाहीत. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच आता प्रिन्स अँड्रू यांच्याकडून पदव्या काढून घेतल्याची आणि त्यांना बकिंगहॅम पॅलेसमधून बेदखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
प्रक्रिया सुरू
बकिंगहॅम पॅलेसने गुरुवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे त्यांचे भाऊ प्रिन्स अँड्रू यांच्या उर्वरित सर्व पदव्या काढून घेत आहेत आणि त्यांना राजघराण्यातून बेदखल करण्यात येत आहे. तसेच ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनी आज प्रिन्स अँड्रू यांच्या सर्व पदव्या आणि त्यांचा सन्मान काढून टाकण्याच्या संदर्भातील सर्व औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे, असे बकिंगहॅम पॅलेसच्या निवेदनात म्हटले आहे.
अँड्रू आता राजकुमार नाहीत
प्रिन्स अँड्रू हे आता फक्त अँड्रू माऊंटबॅटन विंडसर म्हणून ओळखले जातील, म्हणजे ते आता राजकुमार राहिले नाहीत. तसेच ते आता त्यांच्या पर्यायी खासगी निवासस्थानात जातील आणि त्यांना त्या ठिकाणी कायदेशीर संरक्षण दिले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.
मुलींच्या शाही पदव्या कायम
एका वृत्तानुसार, प्रिन्स अँड्रू यांच्या पदव्या जरी काढून घेण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या मुलींच्या पदव्या कायम राहतील. प्रिन्स अँड्रू यांची पत्नी सारा फर्ग्युसन यांनाही बकिंगहॅम पॅलेसमधून बेदखल करण्यात आले आहे. कारण प्रिन्स अँड्रू आणि सारा फर्ग्युसन यांचा १९९६ मध्ये घटस्फोट झालेला आहे. पण तरीही त्या प्रिन्स अँड्रू यांच्याबरोबर त्याच निवासस्थानी राहत होत्या. दरम्यान, प्रिन्स अँड्रू यांनी त्यांच्या पदव्या काढून घेतल्याच्या निर्णयावर काहीही आक्षेप घेतला नाही.
‘जेफ्री एपस्टीन स्कॅण्डल’मध्ये नाव
जेफ्री एपस्टीन स्कँडलमध्ये अँड्रू यांचे नाव आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जेफ्री एपस्टीनवर अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. तसेच त्याने अनेक धनाढ्य आणि बलाढ्य व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवल्याचा देखील आरोप होता. एपस्टीनच्या डायरीत एलन मस्कपासून डोनाल्ड ट्रम्पपर्यंत अनेक बड्या लोकांची नावे आल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्यांनी अँड्रूला राजघराण्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.