धक्कादायक! AliExpress विकतंय चक्क भगवान जगन्नाथाची प्रतिमा असलेलं डोअरमॅट; चीनकडून भारतीय श्रद्धेचा अपमान

चीनच्या AliExpress या वेबसाईटचा संतापजन्य प्रकार समोर आला आहे. भारतासाठी पूजनीय असलेल्या भगवान जगन्नाथाची प्रतिमा असलेला डोअरमॅट चीनच्या AliExpress या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
धक्कादायक! AliExpress विकतंय चक्क भगवान जगन्नाथाची प्रतिमा असलेलं डोअरमॅट; चीनकडून भारतीय श्रद्धेचा अपमान
Published on

चीनच्या AliExpress या वेबसाईटचा पुन्हा एकदा संतापजन्य प्रकार समोर आला आहे. भारतासाठी पूजनीय असलेल्या भगवान जगन्नाथाची प्रतिमा असलेला डोअरमॅट चीनच्या AliExpress या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. भारताच्या संस्कृती आणि श्रद्धेचा अपमान चीनकडून होत असल्याने भारतात विशेषत: ओडिशा राज्यातील भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

AliExpress वर विक्रीसाठी ठेवलेल्या डोअरमॅटवर म्हणजेच पायपुसणीवर भगवान जगन्नाथ यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. इतकंच नव्हे तर संबंधित उत्पादनाच्या जाहिरातीत एक व्यक्ती त्या डोअरमॅटवर उभी दिसत आहे. यामुळे भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या आधीही २०२४ मध्ये AliExpress ने भारतीय देवी देवतांचे अपमान करणारे उत्पादन बाजारात आणले होते.अशा प्रकारच्या अपमानजन्य वस्तू विकणाऱ्या विदेशी कंपन्यांविरोधात भारत सरकारने कठोर भूमिका घ्यावी, असे मतही सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

या प्रकरणावरून सोशल मीडिया युजर्सनी #RespectJagannath आणि #BanAliExpress अशा हॅशटॅगसह तीव्र निषेध व्यक्त केला आहे. अनेकांनी AliExpress ला भारतात बॅन करण्याची मागणी केली आहे.

केवळ आक्षेपार्ह नाही तर तो संस्कृतीचा अपमान -

सोशल मीडिया युजर्सने लिहिले आहे, की “AliExpress द्वारे हे एक लज्जास्पद, अनादराचे कृत्य आहे. लाखो लोक दररोज त्यांची पूजा करतात. पाय ठेवण्यासाठी त्यांचा चेहरा डोअरमॅटवर ठेवणे हे केवळ आक्षेपार्ह नाही तर तो संस्कृतीचा अपमान आहे.''

तर, आणखी काही उत्पादनांवर लक्ष वेधत एका युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे, की त्यांच्याकडे हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या अशा अनेक वस्तू आहेत. हे गालिचे पहा..त्यांच्याकडे इतर धर्माच्या देवतांसाठी गालिचे का नाहीत? असा सवाल त्याने केला आहे.

श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य माधब पूजापांडा यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ओडिशा राज्य सरकार आणि केंद्र सरकारला तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. तसेच, चिनी अधिकाऱ्यांशी राजनैतिक संपर्क साधून अशा अनादरपूर्ण वस्तूंची विक्री थांबवण्याचे सुचवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in