

दुबई/तेल अवीव/तेहरान : मध्यपूर्वेतील युद्ध अधिकच तीव्र होत असून अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई दलाने इराणमधील विविध लष्करी ठिकाणांवर जोरदार सोमवारीही जोरदार बॉम्बहल्ले सुरू ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर इराणसमर्थित सशस्त्र गटांनीही संघर्षात उडी घेतल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. इराणनेही विविध देशांतील अमेरिकन तळांवर सोमवारी प्रतिहल्ले चढवले.
लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट युद्धात सक्रिय झाल्याने लेबनॉन सरकारने स्पष्ट केले आहे की, हिजबुल्लाह या संघटनेच्या सर्व लष्करी कारवाया बेकायदेशीर आहेत आणि त्यांनी शस्त्रे सरकारकडे सुपूर्द करावीत. लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी म्हटले की, युद्ध किंवा शांततेचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राज्यालाच आहे. हिजबुल्लाहने फक्त राजकीय क्षेत्रातच काम करावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सरकारने सुरक्षा यंत्रणांना क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ले रोखण्याचे आणि जबाबदार लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराणमध्ये नेतृत्व पोकळी निर्माण झाली असून प्रादेशिक अस्थिरतेचा धोका वाढला आहे. इराणने याआधीच इस्त्रायल आणि अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, 'डब्ल्यूएचओ'ने मध्यपूर्वेतील संघर्षात नागरिक आणि आरोग्य सुविधांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. "नागरिकांचे आणि आरोग्य सेवेचे संरक्षण अत्यावश्यक आहे," असे प्रादेशिक संचालक हनन बल्खी यांनी म्हटले आहे.
संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून जागतिक बाजारपेठाही या संघर्षामुळे हादरल्या आहेत. पुढील काही दिवसांत या युद्धाचे परिणाम अधिक व्यापक स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुवैतकडून चुकून अमेरिकन लढाऊ विमाने लक्ष्य
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन अमेरिकन एफ-१५ई स्ट्राईक ईगल लढाऊ विमाने पाडण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे, तर अमेरिकेने हा दावा फेटाळून लावताना सांगितले की, कुवैतच्या हवाई संरक्षण यंत्रणेकडून चुकून तीन अमेरिकन एफ-१५ई स्ट्राईक ईगल लढाऊ विमाने पाडण्यात आली. अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणने प्रथमच आपल्या जुन्या लढाऊ विमान ताफ्यासह, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे कुवैतवर थेट हल्ला चढवला. मात्र, या हल्ल्यात सर्व सहा वैमानिक सुरक्षित बाहेर पडले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
इराणमध्ये आतापर्यंत ५५५ जणांचा मृत्यू
इराण आणि त्याच्या समर्थक अतिरेकी गटांनी इस्त्रायल तसेच काही अरब देशांवर क्षेपणास्त्र डागले. कुवैतमधील अमेरिकन दूतावासाच्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. इराणमध्ये अमेरिकन-इस्त्रायली हवाई मोहिमेमुळे आतापर्यंत किमान ५५५ जणांचा मृत्यू झाला असून १३० हून अधिक शहरांवर हल्ले झाले आहेत, अशी माहिती इराणी रेड क्रेसेंटने दिली. इस्त्रायलमध्ये ११, तर लेबनॉनमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
सौदीतील तेल प्रकल्पावर ड्रोन हल्ला
इराणने संघर्षाचा व्याप वाढवत सौदी अरेबियातील रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला. हा प्रकल्प पूर्व सौदीतील दमामजवळ असून जगातील सर्वात मोठ्या रिफायनऱ्यांपैकी एक आहे. हल्ल्यानंतर तो तात्पुरता बंद ठेवण्यात आला.
एका भारतीयाचा मृत्यू
ओमानच्या आखातात मार्शल आयलंड्स-ध्वजांकित तेलवाहू जहाजावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने हल्ला केला, ज्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांनाही इशारा दिला आहे. या सामुद्रधुनीतूनच जगातील सर्वाधिक तेल वाहतूक होते. ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले करून जागतिक आर्थिक दबाव निर्माण करणे हा इराणचा उद्देश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हिजबुल्लाहकडून इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला
लेबनॉनमधून हिजबुल्लाने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याची कबुली दिली असून, त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल लेबनॉनमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत किमान ३१ जण ठार आणि १४९ जखमी झाले आहेत. इस्रायलच्या उत्तरेकडील कमांडचे प्रमुख मेजर जनरल राफी मिलो यांनी हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला.
सायप्रसमधील ब्रिटिश लष्करी तळावर हल्ला
ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सायप्रसमधील ब्रिटिश लष्करी तळावर संशयास्पद ड्रोन हल्ला झाला. हा हल्ला मध्यरात्री अक्रोटिरी तळावर झाला. ब्रिटिश सैन्य प्रत्युत्तर म्हणून कारवाई करत आहे. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी इराणी क्षेपणास्त्र स्थळांवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेला या तळाचा वापर करण्याची परवानगी दिली होती.
इराणचा अमेरिकेशी वाटाघाटीस नकार
इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी सोमवारी सांगितले की, इराण अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही. इराणने अमेरिकेशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचा ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळून लावला.
दोन इराणी गुप्तचर अधिकारी ठार
इस्त्रायलने म्हटले आहे की, त्यांनी इराणच्या गुप्तचर मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांना ठार मारले आहे. इस्रायल संरक्षण दलांनी (आयडीएफ) दावा केला की, अचूक गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या हवाई हल्ल्यात सय्यद याह्या हमीदी आणि जलाल पौर हुसेन यांना लक्ष्य करण्यात आले. हमीदी हे "इस्त्रायली व्यवहार" विभागाचे उपमंत्री होते आणि त्यांच्यावर यहुदी, पाश्चात्य नागरिक आणि परदेशात इराणविरोधी घटकांविरुद्ध कारवाया केल्याचा आरोप होता. तर जलाल पौर हुसेन हे हेरगिरी विभागाचे प्रमुख होते.
फ्रान्सकडून हल्ल्यांवर प्रश्नचिन्ह
फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या एकतर्फी हल्ल्यांवर प्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी होती. त्यांनी सांगितले की, अशा बाबींवर निर्णय घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसारखे मंच अस्तित्वात आहेत. जर हा विषय तेथे, विशेषतः सुरक्षा परिषदेकडे पाठवला गेला तर लष्करी बळाच्या वापराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळू शकेल.
जर्मनीचा इराणविरुद्धच्या युद्धात सामील होण्याचा विचार
जर्मनीने म्हटले आहे की, ते इराणविरुद्ध अमेरिका-इस्त्रायल मोहिमेत सामील होण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत. जर इराणने त्यांच्या प्रदेशांवर हल्ले थांबवले नाहीत तर ते प्रत्युत्तर देतील. अमेरिकेसोबत संभाव्य लष्करी कारवाईसाठी आधीच नियोजन सुरू आहे, ज्यामध्ये बॉम्बस्फोट हल्ल्यांमध्ये सहभागी होण्यापासून ते लॉजिस्टिक आणि हवाई सहाय्य प्रदान करणे समाविष्ट आहे.
इराणमध्ये चिनी नागरिकाची हत्या
इराणच्या तेहरानमध्ये एका चिनी नागरिकाची हत्या करण्यात आल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंसक निदर्शने
भारताव्यतिरिक्त पाकिस्तानातही खामेनी यांच्या मृत्यूच्या विरोधात गोंधळ सुरू आहे. सोमवारी सकाळी पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये हिंसक निदर्शने झाली. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये आंदोलकांनी युनायटेड नेशन्सच्या कार्यालयांना आग लावली. ज्यात गिलगिटमधील युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या कार्यालयाचाही समावेश आहे.
त्याचबरोबर, स्कर्दूमध्ये एसपी कार्यालय आणि अनेक सरकारी इमारतींनाही आग लावण्यात आली. आंदोलकांवर गोळीबार केल्यामुळे ७ आंदोलक ठार झाले, १२ हून अधिक जखमी आहेत. येथील रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. गिलगिट आणि स्कर्दूमध्ये सुरक्षा उच्च सतर्कतेवर आहे.
ट्रम्प यांची इराणला धमकी
इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर तसेच नौदल मुख्यालयावर बॉम्बहल्ले केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणची नऊ युद्धनौका बुडवण्यात आल्याचे आणि नौदल मुख्यालय मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. तसेच कुवैतमध्ये ठार झालेल्या तीन अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याचा इराणचा दावा
दरम्यान, इराणचे अणुऊर्जा प्रकल्प लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडे इराणचे प्रतिनिधी रझा नजाफी यांनी नतांझ येथील अणुऊर्जा समृद्धीकरण केंद्रावर हल्ला झाल्याचा दावा केला. मात्र, इस्रायल किंवा अमेरिकेकडून याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
भारतीय शेअर बाजारात घसरण
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला. सेन्सेक्स १०४८.३४ अंकांनी (१.२९%) घसरून ८०,२३८.८५ अंकांवर बंद झाला. निफ्टी देखील सुमारे ३१२.९५ अंकांनी (१.२४%) घसरून २४,८६५.७० अंकांवर बंद झाला.
कच्चे तेल १०% वाढून ७९ डॉलरवर पोहोचले
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आज ऊर्जा आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूडच्या किमती १०% वाढून प्रति बॅरल ७९ डॉलरवर पोहोचल्या. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर हा तणाव आणखी वाढला तर तेलाच्या किमती प्रति बॅरल १२० डॉलरवर पोहोचू शकतात.
सोन्याचा भाव ५,००० रुपयांनी वाढला
एमसीएक्स फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.६७ लाख रुपयांवर आहे, जो ५,००० रुपयांनी (३%) वाढला आहे. चांदीचा भाव ८,००० रुपयांनी (३%) वाढून २.९१ लाख रुपयांवर पोहोचला आहे.