
मोरोक्कोमध्ये यंदाच्या बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीवर बंदी घालण्यात आली आहे. देशातील भीषण दुष्काळ आणि त्यातून निर्माण झालेल्या पशुधनाच्या टंचाईमुळे राजा मोहम्मदने (सहावा) यंदा कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने याबाबत स्पष्ट आदेश जारी करत सांगितले आहे की, कुणीही कुर्बानी देऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल.
मोरोक्कोमध्ये जवळपास ९९ टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे आणि बकरी ईद हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. त्यामुळे कुर्बानीवर आलेली बंदी जनतेत नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण करत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला, तर काही भागांमध्ये पोलीसांनी घराघरांतून बेकायदेशीररित्या आणलेल्या बकरी आणि मेंढया जप्त केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
राजाच्या या निर्णयामुळे धार्मिक परंपरांमध्ये सरकारचा हस्तक्षेप सुरू असल्याची टीका होत आहे. अनेक नागरिकांनी हा धार्मिक श्रद्धेचा अपमान असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करता हा निर्णय आवश्यक असल्याचे समर्थन केले आहे.
राजाने जनतेला आवाहन केले आहे की, यंदा कुर्बानी टाळून प्रार्थना, दान आणि सेवा यावर भर द्यावा. मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे संतप्त नागरिकांनी सरकारवर सामाजिक आणि धार्मिक भावना दडपण्याचा आरोप केला आहे.