ऐतिहासिक कामगिरी! १० दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण; आर्टेमिस-२चे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतले, Video

NASA Artemis II Splashdown : नासाची आर्टेमिस-२ मोहीम यशस्वी ठरली असून चार अंतराळवीरांनी १० दिवसांचा प्रवास पूर्ण करून सुरक्षित पृथ्वीवर पुनरागमन केले.
ऐतिहासिक कामगिरी! १० दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण; आर्टेमिस-२चे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतले, Video
ऐतिहासिक कामगिरी! १० दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण; आर्टेमिस-२चे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतले, Video(Photo-X/@NASA)
Published on

नासाच्या (NASA) आर्टेमिस-२ (Artemis II) मोहिमेतील चार अंतराळवीरांनी १० दिवसांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण करत सुरक्षितपणे पृथ्वीवर पुनरागमन केले. ओरियन (Orion spacecraft) अंतराळयानाचे पॅसिफिक महासागरामध्ये, सॅन दिएगो किनाऱ्याजवळ, भारतीय वेळेनुसार सकाळी ५.३७ वाजता समुद्रात सुरक्षित (Splashdown) उतरले.

पॅसिफिक महासागरात यशस्वी लँडिंग

या मोहिमेत रीड वाईझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच (अमेरिका) आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन यांचा समावेश होता. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना सुमारे ५,००० फॅरेनहाइट (सुमारे २,७६० अंश सेल्सियस) इतक्या तीव्र उष्णतेचा सामना करत अंतराळयानाने सुरक्षित लँडिंग केले. या मोहिमेत पॅराशूट यंत्रणाही अचूकपणे कार्यरत राहिली.

विक्रमी अंतर गाठले

या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी पृथ्वीपासून सुमारे ४,०६,७७८ किलोमीटर अंतर गाठले. हा टप्पा अपोलो-१३ (Apollo 13) मोहिमेपेक्षा सुमारे ६,६०६ किमीने अधिक आहे. ६ एप्रिल रोजी त्यांनी चंद्राच्या पृथ्वीपासून लपलेल्या भागाचे छायाचित्रणही केले.

५० वर्षांनंतर ऐतिहासिक झेप

१ एप्रिल रोजी स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेटद्वारे (SLS) ही मोहीम सुरू झाली होती. १९७२ मध्ये अपोलो-१७ नंतर पृथ्वीच्या निम्न कक्षेबाहेर गेलेली ही पहिली मानवयुक्त मोहीम ठरली.

ओरियनची यशस्वी चाचणी

या मोहिमेचा मुख्य उद्देश जीवनसुरक्षा प्रणाली, उष्णता संरक्षण कवच (हीट शील्ड) आणि डीप-स्पेस नेव्हिगेशन यांची चाचणी घेणे हा होता. ताशी सुमारे ४२,००० किमी वेगाने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना काही मिनिटे संपर्क तुटला, मात्र त्यानंतर अंतराळयान सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी उतरले.

अंतराळवीर सुरक्षित

लँडिंगनंतर नौदलाच्या तज्ज्ञांनी अंतराळयान सुरक्षित असल्याची खात्री करून ते उघडले आणि अंतराळवीरांना बाहेर काढले. सर्व सदस्य सुरक्षित असल्याची माहिती कमांडर रीड वाइजमन यांनी दिली. त्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ते निरोगी असल्याचे स्पष्ट झाले.

नासाची मोठी कामगिरी

नासाच्या अधिकाऱ्यांनी ही मोहीम अचूक नियोजन आणि हजारो तज्ज्ञांच्या मेहनतीचे यश असल्याचे सांगितले. ही कामगिरी भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

पुढील टप्पा - चंद्र ते मंगळ

माहितीनुसार, या यशानंतर पुढील आर्टेमिस-३ मोहिमेद्वारे मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवण्याची तयारी सुरू आहे. तसेच भविष्यात मंगळ मोहिमेच्या दिशेनेही पावले उचलली जात आहेत.

चंद्रावर तळ उभारण्याचा मार्ग मोकळा

या मोहिमेच्या यशामुळे नासाच्या चंद्र मोहिमांना मोठी चालना मिळाली आहे. दशकाअखेरपर्यंत चंद्रावर तळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

आर्टेमिस-२ मोहिमेच्या यशामुळे भविष्यात नियमित मानवयुक्त मोहिमा आणि सौरमालेतील पुढील अन्वेषणासाठी नवी दिशा मिळाली आहे. या मोहिमेमुळे चंद्रावर दीर्घकालीन मानवी वास्तव्य (तळ) उभारण्याच्या दिशेने मोठी प्रगती झाली आहे. आगामी काळात नियमित मानवयुक्त मोहिमा राबवण्यास यामुळे मदत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in