Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप; भारतासह 'या' देशांनाही धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

इमारती, घरे आणि विजेचे खांब हादरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अनेकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली.
Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप; भारतासह 'या' देशांनाही धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप; भारतासह 'या' देशांनाही धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण(Photo-X)
Published on: 

नेपाळमध्ये मंगळवारी (दि.२४) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. कोशी प्रांतात चीनच्या सीमेजवळ झालेल्या या भूकंपाची तीव्रता ५.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के भारतासह भूतान, बांगलादेश आणि चीनमधील काही भागांतही जाणवले. सिक्कीम आणि उत्तर बंगालमध्ये अनेक ठिकाणी नागरिक घाबरून घराबाहेर पडले. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

नेमके कुठे होते भूकंपाचे केंद्र?

अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या (USGS) माहितीनुसार, नेपाळच्या पूर्वेकडील कोशी प्रांतातील लेलेपजवळ, चीनच्या सीमेलगत हा भूकंप झाला. भारताच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीखाली २० किलोमीटर खोलीवर होते. हे केंद्र २७.८५५ अंश उत्तर अक्षांश आणि ८७.९०९ अंश पूर्व रेखांशावर नोंदवण्यात आले. तर नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने तप्लेजुंग जिल्ह्यातील ओलांगचुंग गोला येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे म्हटले आहे. हे ठिकाण काठमांडूपासून सुमारे २७५ किलोमीटर पूर्वेला आहे. युरोपियन-मेडिटेरेनियन भूकंपशास्त्र केंद्राने (EMSC) भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे नोंदवले आहे.

सिक्कीम, उत्तर बंगालमध्ये नागरिकांची धावपळ

भूकंपाचे धक्के नेपाळमधील पूर्वेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये जाणवले. भारतात सिक्कीमसह पश्चिम बंगालमधील उत्तर भागातही जमीन हादरली. दार्जिलिंग, जलपायगुडी आणि कूचबिहारसह अलिपुरद्वार जिल्ह्यातील काही भागांतही धक्के जाणवले. बिहार आणि मेघालयमधील काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. इमारती, घरे आणि विजेचे खांब हादरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अनेकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांनाही अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे हादरा बसला.

आसाममध्येही भूकंपाची नोंद

दरम्यान, आसाममधील कार्बी आंगलाँग जिल्ह्यातही मंगळवारी पहाटे स्वतंत्र भूकंपाची नोंद झाली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी २.५ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली जमिनीखाली १५ किलोमीटर होती. त्याचे केंद्र २५.७४३ अंश उत्तर अक्षांश आणि ९३.३५५ अंश पूर्व रेखांशावर नोंदवण्यात आले.

दरम्यान, नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाबाबत वेगवेगळ्या संस्थांनी तीव्रता आणि वेळेच्या नोंदीत काही फरक दिला आहे. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने या भूकंपाची तीव्रता ५.६ असल्याचे आणि वेळ सकाळी ७ वाजून १७ मिनिटे असल्याचे नोंदवले आहे. मात्र, NCS आणि EMSC यांनी तीव्रता ५.३ नोंदवली आहे. सध्या संबंधित भागांतील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून, कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)