Nepal Floods: भारत नेपाळच्या मदतीला; ३७.५ टन मदतसाहित्य रवाना, १६० हून अधिक मृत्यू, ८०० जणांचा अद्याप ठाव नाही

नेपाळमधील भीषण महापुरानंतर भारताने ३७.५ टन मदतसाहित्य, औषधे आणि अन्नाची पाकिटे पाठवली आहेत. आतापर्यंत १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ८०० जण बेपत्ता आहेत.
Nepal Floods: भारत नेपाळच्या मदतीला; ३७.५ टन मदतसाहित्य रवाना, १६० हून अधिक मृत्यू, ८०० जणांचा अद्याप ठाव नाही
Published on

नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे मोठी जीवितहानी झाली असून, अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात भारताने नेपाळला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून ३७.५ टन मदतसाहित्य, औषधे आणि अन्नाची पाकिटे घेऊन दुसरे विमान नेपाळकडे रवाना करण्यात आले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी 'एक्स'वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. भारत नेपाळच्या प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, बचाव आणि मदतकार्यात पुढेही आवश्यक ती मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

भारताकडून दुसऱ्यांदा मदत

भारताने यापूर्वीही नेपाळला १० टन मदतसाहित्य पाठवले होते. नेपाळमधील भारतीय दूतावासाने हा मदतसाठा नेपाळचे संस्कृती, पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक मंत्री खडका राज पौडेल यांच्याकडे सोपवला होता. "भारत नेहमी नेपाळसोबत आहे," असे भारतीय दूतावासाने त्यावेळी म्हटले होते. नेपाळला या कठीण परिस्थितीत शक्य ती सर्व मदत केली जाईल, असेही दूतावासाने स्पष्ट केले.

नेमका महापूर कसा आला?

नेपाळमधील भोटेकोशी नदीच्या परिसरात अचानक आलेल्या महापुरामुळे मोठा विध्वंस झाला. वृत्तांनुसार, हिमस्खलनामुळे भोटेकोशी नदीला मिळणाऱ्या ल्हेंदे नदीचा प्रवाह अडला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी अचानक खाली आले. चीनच्या सीमेजवळील रसुवागढी परिसरातील टिमुरे भागाला या पाण्याचा मोठा फटका बसला. त्यानंतर पाण्याचा प्रवाह स्याफ्रुबेसीच्या दिशेने पुढे गेला.

विशेष म्हणजे, महापूर आला तेव्हा या भागात पाऊस सुरू नव्हता, असे वृत्तांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याची पूर्वकल्पना स्थानिकांना मिळू शकली नाही.

१६० हून अधिक जणांचा मृत्यू, ८०० जण बेपत्ता

या महापुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, आतापर्यंत १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ८०० जण अद्याप बेपत्ता आहेत.

बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये सुमारे ३०० भारतीयांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या काही भारतीय यात्रेकरूंचाही यामध्ये समावेश आहे. तसेच, अनेक भारतीय पर्यटक नेपाळच्या वेगवेगळ्या भागांत अडकून पडले आहेत.

ईशा फाऊंडेशनचे ७७ जणही बेपत्ता

दरम्यान, ईशा फाऊंडेशनतर्फे नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले ७७ जणही बेपत्ता असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. याशिवाय, तमिळनाडूतून नेपाळला गेलेले ३७ पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. पुरामुळे नेपाळच्या मध्यवर्ती भागातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते आणि भागांचा संपर्क तुटल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बचावकार्य सुरू

दरम्यान, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावाही घेतला जात आहे. भारताने पाठवलेल्या दुसऱ्या मदतसाठ्यात औषधे, अन्नाची पाकिटे आणि आपत्कालीन मदतीसाठी आवश्यक साहित्य आहे. नेपाळमधील परिस्थिती सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in