Nepal Floods : महापुरात गावं वाहून गेली, तरी 'ते' घर तग धरून उभं! काय आहे यामागचं रहस्य?

नेपाळच्या भीषण महापुरात गावं आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या, तरी एक दुमजली घर तग धरून उभं राहिलं.
Nepal Floods : महापुरात गावं वाहून गेली, तरी 'ते' घर तग धरून उभं! काय आहे यामागचं रहस्य?
Nepal Floods : महापुरात गावं वाहून गेली, तरी 'ते' घर तग धरून उभं! काय आहे यामागचं रहस्य?
Published on

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने अक्षरशः हाहाकार माजवला. गावं उद्ध्वस्त झाली, इमारती कोसळल्या आणि पुराच्या पाण्यासोबत आलेल्या माती, दगड-धोंडे आणि मलब्याने मोठा विध्वंस केला. या आपत्तीतील मृतांचा आकडा आता ९०३ वर पोहोचला आहे. अशा भयावह परिस्थितीत महापुराच्या तडाख्यात एक दुमजली घर मात्र तग धरून उभं असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुराचे प्रचंड लोट घराच्या आजूबाजूने वाहत असतानाही बाल्कनीत काही नागरिक उभे असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. आजूबाजूला एवढा विध्वंस झाला असताना हे घर नेमकं कसं वाचलं, याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मृतांचा आकडा ९०३ वर

नेपाळच्या नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीच्या (NDRRMA) माहितीनुसार, सोमवार, ३१ ऑगस्टपर्यंत महापुरातील मृतांचा आकडा ९०३ वर पोहोचला आहे. बचाव आणि शोधमोहीम सुरू असून विविध भागांतून मृतदेह सापडत आहेत. अद्याप ४,२४७ जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

आजूबाजूची घरं कोसळली, मग हे घर कसं टिकून राहिलं?

महापुराचा जोरदार प्रवाह अनेक ठिकाणी विध्वंस करत असताना हे घर मात्र तग धरून राहिल्याने सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. घराच्या बांधकामाची रचना नेमकी कशी आहे आणि पुराच्या प्रचंड प्रवाहाचा तडाखा बसूनही ते कोसळलं कसं नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बांधकामाची रचना ठरली महत्त्वाची?

एक्सवर 'आर्किटेक्चर प्रेझेंटेशन' या खात्यावरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये या घराच्या टिकून राहण्यामागची संभाव्य कारणं सांगण्यात आली आहेत. या विश्लेषणानुसार, हिमालयीन भागातील अनेक घरांमध्ये दगडी बांधकामाचा वापर केला जातो. अशी बांधकामं उभा भार चांगल्या प्रकारे पेलू शकतात. मात्र, बाजूने येणारा प्रचंड दबाव सहन करण्याची त्यांची क्षमता तुलनेने कमी असू शकते.

याउलट, पुरात वाचलेल्या या घरामध्ये 'रिइन्फोर्स्ड काँक्रिट फ्रेम' (RCC) पद्धतीचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. लोखंडी सळ्यांनी जोडलेली फ्रेम, काँक्रिटचे कॉलम, बीम आणि मजबूत पाया यामुळे संपूर्ण इमारतीला एकसंध आधार मिळतो. त्यामुळे पुराच्या पाण्यासोबत आलेल्या माती, चिखल आणि मोठ्या दगडांचा बाजूने आलेला प्रचंड दबाव या मजबूत सांगाड्याने पेलला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

घराची जागाही ठरली कारणीभूत?

या घराच्या टिकून राहण्यामागे त्याची जागाही महत्त्वाची ठरली असण्याची शक्यता आहे. व्हिडीओतील विश्लेषणानुसार, पुराचा मुख्य प्रवाह ज्या खोल मार्गातून जात होता, त्यापासून हे घर किंचित उंचावर आणि बाजूला होतं. त्यामुळे पाणी आणि मलब्याचा सर्वाधिक जोर थेट घरावर आदळण्याऐवजी त्याचा प्रवाह दोन्ही बाजूंनी विभागला गेला.

प्रवाहासोबत आलेला मलबा घराच्या आजूबाजूला साचत गेला आणि त्यातून एक प्रकारचा नैसर्गिक उतार तयार झाला. त्यामुळे नंतर आलेल्या पाण्याच्या लाटांचा थेट मारा घरावर कमी झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मजबूत काँक्रिटची रचना आणि घराची जागा ही दोन कारणं त्याच्या बचावासाठी महत्त्वाची ठरली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत तांत्रिक निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in