

काठमांडू : नेपाळमध्ये महापुराने हाहाकार माजवला असताना माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचे केस पकडून तिला किनाऱ्यावर ओढण्यात आले आणि तिच्या कानातील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेपाळ पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
केसांना धरून मृतदेह ओढला
व्हायरल झालेल्या ४१ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये ही घटना दिसत आहे. नारायणी नदीच्या पुराच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह वाहून आला होता. यावेळी दोन पुरुषांनी लाकडी पाट्यांचा वापर करत मृतदेह पाण्याबाहेर ओढला. यासाठी त्यांनी महिलेच्या डोक्याचे केसही पकडले. मृतदेह किनाऱ्यावर आणल्यानंतर तिच्या दोन्ही कानातील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले. विशेष म्हणजे, हा प्रकार सुरू असताना आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते. काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होते. मात्र, या दोघांना रोखण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही.
व्हिडिओच्या आधारे दोघांना अटक
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेपाळ पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. संबंधित व्हिडिओ पोलिसांनीही आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यासोबत या प्रकरणातील कारवाईची माहिती दिली आहे. व्हिडिओच्या आधारे चितवन पोलिसांनी तपास करत दोन संशयितांची ओळख पटवली. मदन गुरुंग (२५) आणि उमेश चौधरी (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भरतपूर महानगरपालिकेच्या पोखरा बस पार्क परिसरातून गुरुवारी दोघांना ताब्यात घेण्यात आले.
नेपाळ पोलिसांनी सांगितले की, आपत्तीच्या काळात पीडितांची लूट करणे किंवा त्यांच्याशी अमानवी वर्तन करणे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
महापुरात ४६९ जणांचा मृत्यू
दरम्यान, नेपाळमधील या भीषण महापुरातील मृतांचा आकडा शुक्रवारी ४६९ वर पोहोचला आहे. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील आठ जिल्ह्यांतून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चितवनमध्ये १७८, नवलपरासी पूर्वमध्ये ११०, गोरखामध्ये ४४, नुवाकोटमध्ये ३७ आणि धादिंगमध्ये ३३ मृतदेह सापडले आहेत. तसेच तनाहूमध्ये २८, नवलपरासी पश्चिममध्ये २७ आणि रसुवामध्ये १२ मृतदेह सापडले आहेत.
१,५४५ जणांची सुटका
पूरग्रस्त भागांतून आतापर्यंत १,५४५ जखमी आणि अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी ८४ जणांवर काठमांडूमधील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. शोध आणि बचावकार्य तिसऱ्या दिवशीही सुरू असून, यासाठी ७,४५१ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये नेपाळ लष्कराच्या २,३९१ जवानांचा समावेश आहे.
हिमनदी कोसळल्याने महापूर
नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमनदी कोसळल्यानंतर बर्फ आणि दगडांचा मोठा लोंढा खाली आला. त्यातून पाणी, चिखल आणि मलब्याचा प्रचंड प्रवाह मध्य नेपाळच्या दिशेने वाहत आला. या महापुरामुळे अनेक शहरे आणि गावांचे मोठे नुकसान झाले. घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले, तर जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले.