नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरून उसळलेले आंदोलन आता पूर्णपणे राजकीय भुंकपात बदलले आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले
Published on

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरून उसळलेले आंदोलन आता पूर्णपणे राजकीय भुंकपात बदलले आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संतप्त आंदोलकांनी अर्थमंत्री विष्णू पौडेल, माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांच्या पत्नी परराष्ट्र मंत्री आरजू राणा देउबा यांना बेदम मारहाण केली. सरकारने आंदोलनापुढे नमतं घेऊनही राजधानी काठमांडूसह अनेक शहरांत हिंसा, जाळपोळ आणि तोडफोड सुरू असून परिस्थिती पूर्णपणे बेकाबू झाली आहे.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा राजीनामा

सोशल मीडिया बंदीविरोधातील तरुणांच्या आक्रमक आंदोलनामुळे नेपाळ देशातील कायदा-सुव्यवस्था ढासळली. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा सादर केला. त्यानंतर काही तासांतच राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनीही पदत्यागाची घोषणा केली. ओली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अज्ञातस्थळी गेले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

मंत्र्यांची राजीनाम्यांची मालिका

तरुणांच्या प्रचंड संतापामुळे मंत्रिमंडळावरही दबाव वाढला. पहिल्यांदा गृहमंत्री रमेश लेखक, कृषीमंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल आणि पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनी राजीनामा दिला. त्यानंतर वाढत्या दबावामुळे ओली यांनाही पद सोडावे लागले.

संतप्त तरुणांचे नेत्यांवर हल्ले

आंदोलक तरुणांनी राजधानी काठमांडूमधील संसद भवनात घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ केली. राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या निवासस्थानीही आग लावण्यात आली. अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना रस्त्यावर पाठलाग करून आंदोलकांनी बेदम मारहाण केली. माजी पंतप्रधान पुष्पकमल दाहल आणि शेर बहादूर देऊबा यांच्या घरांवर हल्ला केला. तर, या हल्ल्यात शेर बहादूर देउबा आणि त्यांच्या पत्नीला जबर मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. रमेश लेखक आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घरांना आग लावण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in