पाकिस्तान पुन्हा एकदा भीषण बॉम्बस्फोटाने हादरले आहे. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा शहरात मंगळवारी (दि. ३०) दुपारी झालेल्या शक्तिशाली आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून, ३२ हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही सामान्य नागरिकांसह सुरक्षा जवानांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या भयानक स्फोटाचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
एफसी मुख्यालयाजवळ हल्ला
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा स्फोट क्वेट्टाच्या झरघुन रोडवरील फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयाजवळ झाला. स्फोटकांनी भरलेले वाहन थेट मुख्यालयाच्या दिशेने नेऊन टक्कर दिल्यानंतर हा भीषण स्फोट झाला. जोरदार आवाजामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि आसपासच्या घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या.
बलुचिस्तानचे आरोग्यमंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित ५ जणांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. स्फोटानंतर शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
भीतीचे वातावरण आणि गोळीबार
स्फोटानंतर लगेचच परिसरात गोळीबारही झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस व बचाव पथके घटनास्थळी दाखल होऊन परिसर सील करण्यात आला आहे. शोधमोहिमेला गती देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या हल्ल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये गर्दीच्या रस्त्यावर अचानक स्फोट होताना दिसतो आणि काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर व्यापलेले दिसते.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, हा स्फोट फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी मुख्यालयाजवळ झाल्याने निमलष्करी सुरक्षा दलाला लक्ष्य केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी स्फोटाचे स्वरूप आणि मास्टरमाइंड शोधण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे.