पाकिस्तानकडून सूड! इस्लामाबादमध्ये भारतीय राजदूतांना त्रास; गॅस, पाणी रोखले, व्हिएन्ना कराराचे उल्लंघन?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांतील तणाव अद्याप ओसरलेला नाही. इस्लामाबादस्थित भारतीय उच्चायुक्तालयातील राजनैतिक अधिकाऱ्यांना अलीकडेच पाकिस्तानकडून विविध प्रकारे लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानकडून सूड! इस्लामाबादमध्ये भारतीय राजदूतांना त्रास; गॅस, पाणी रोखले, व्हिएन्ना कराराचे उल्लंघन?
Published on

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांतील तणाव अद्याप ओसरलेला नाही. इस्लामाबादस्थित भारतीय उच्चायुक्तालयातील राजनैतिक अधिकाऱ्यांना अलीकडेच पाकिस्तानकडून विविध प्रकारे लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे. प्रत्युत्तरादाखल भारतानेही नवी दिल्लीतील पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांना होणारा वृत्तपत्रांचा पुरवठा थांबवला असल्याची सुत्रांची माहिती आहे.

भारतीय राजदूतांच्या मूलभूत सुविधा रोखल्या

'इंडिया टुडे'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. माहितीनुसार, पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील स्वयंपाकाचा गॅस, पिण्याचे पाणी आणि रोज मिळणारी वर्तमानपत्रे यांसारख्या मूलभूत सेवांचा पुरवठा थांबवला आहे. यामुळे भारतीय अधिकाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे दैनंदिन जीवन कठीण झाले आहे. तसेच, पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून भारतीय राजदूतांच्या हालचालींवर पाळत ठेवली जात असल्याची माहितीही समोर आली आहे. ज्या व्हिएन्ना करारानुसार राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची आणि सन्मानाची हमी दिली जाते, त्या कराराचं हे स्पष्ट उल्लंघन असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.

गॅस, पाणी, वर्तमानपत्र पुरवठा खंडित

उच्चायुक्तालय परिसरातील गॅस पाईपलाईन बंद करण्यात आली असून गॅस सिलेंडर विक्रेत्यांना भारतीय कर्मचाऱ्यांना सिलेंडर विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी, त्यांना खुल्या बाजारात महागड्या दराने सिलेंडर विकत घ्यावे लागत आहेत. तसेच, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही थांबवला आहे. भारतीय उच्चायुक्तालयात स्थानिक वर्तमानपत्र पोहोचू नयेत यासाठीही पावले उचलली गेली आहेत. यामुळे अधिकाऱ्यांना स्थानिक घडामोडींबद्दल माहिती मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे.

सर्जिकल स्ट्राईकनंतरही केले होते 'नापाक' कृत्य

असा प्रकार पाकिस्तानने पहिल्यांदाच केला नसून याआधीही २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केले, तेव्हाही इस्लामाबादमधील भारतीय अधिकाऱ्यांना अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर आणि भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतरच हे निर्बंध लागू झाले आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI ने हे पाऊल उचलून 'सूड' उगवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनांमुळे आधीच तणावपूर्ण असलेले भारत-पाकिस्तान संबंध आणखी बिघडण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in