
जगभरात प्रसिद्ध असणारी 'कोल्हापुरी चप्पल' चर्चेचा विषय ठरली आहे. कारण महाराष्ट्राच्या कारागिरांची मूळ निर्मिती असलेली ही चप्पल परदेशात PRADA ब्रॅंडच्या नावाखाली तब्बल १ लाखापेक्षा जास्त किंमतीला विकली जात आहे. तर, भारतात या चपलेची किंमत २५० रुपयांपासून सुरू होते. तसेच, या चपलेच्या निर्मितीला कुठेही महाराष्ट्रातील चर्मकार कारागिरांना श्रेय दिलेले नाही. त्यामुळे भारतीयांनी यावर तीव्र आक्षेप घेत या प्रकाराला स्पष्टपणे 'सांस्कृतिक चोरी' म्हंटले आहे.
इटालियन लक्झरी फॅशन ब्रॅंड PRADA ने आपल्या 'स्प्रिंग/समर २०२६'च्या मिलान शोमध्ये अशा सँडल्स सादर केल्या ज्या हुबेहूब पारंपरिक 'कोल्हापुरी चप्पल' आहेत. PRADA च्या या डिझाइनमध्ये गडद तपकिरी रंग, पातळ पट्ट्या आणि पायाचा अंगठा यांचा समावेश आहे. PRADA ने या शोमध्ये ‘लेदर रिंग टोकन’ सुद्धा दिले, जे कोल्हापुरी चप्पलमधील महत्त्वपूर्ण टो-लूप डिझाइनवर आधारित होते.
'प्राडा'च्या लाखांच्या चप्पलमागे कोणाचे श्रेय?
PRADA च्या या डिझाईन्सची किंमत तब्बल १.१६ लाख आहे. मात्र, या सादरीकरणात 'प्राडा'ने कोल्हापूर किंवा चर्मकार समाजातील कारागीरांना ना कुठलेही श्रेय दिले, ना उल्लेख केला. यामुळे भारतीय समाजात संतापाची लाट उसळली असून या प्रकाराला 'सांस्कृतिक चोरी' ठरवण्यात आले आहे.
सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक -
सोशल मिडियावर भारतीयांनी PRADA ला विरोध करत म्हंटले, की ''ही कोल्हापुरी चप्पल आहे. आमची नक्कल करणे आणि आम्ही बनवलेल्या प्रत्येक गोष्टीचे नाव बदलणे थांबवा.''
तर, 'X'वर एका युजरने लिहिले, ''PRADA च्या 1.2 लाखांच्या कोल्हापुरी चप्पलांचा प्रकार हे सांस्कृतिक शोषणाचे ठळक उदाहरण आहे. चर्मकार समाजाच्या परंपरेतून आलेल्या या डिझाईनला ना श्रेय आहे ना पोचपावती. ती महागड्या दराने विकली जाते. जेव्हा चोरीच्या परंपरांवर लक्झरी वाढते, तेव्हा ती फॅशन नसते तर चोरी असते.''
इंस्टाग्रामवर एका वापरकर्त्याने म्हंटले आहे, ''जर तुम्हाला स्वत: काही निर्माण करता येत नाहीये तर दुसऱ्याची कला चोरू नका. किमान त्यांना श्रेय द्या.''
कोल्हापुरी चप्पल - शतकानुशतकांची परंपरा
१२व्या-१३व्या शतकापासून अस्तित्वात असलेली कोल्हापुरी चप्पल ही केवळ एक पादत्राण नव्हे; तर ती कला, परंपरा आणि कारागिरांच्या कौशल्याचा नमुना आहे. या चप्पलांची खासियत म्हणजे ती हस्तनिर्मित असून अस्सल चामड्यापासून तयार केली जाते. तयार करताना कोणतेही रासायनिक पदार्थ, डिंक किंवा सोल्युशन वापरले जात नाही. त्याऐवजी, प्राकृतिक मातीचा वापर केला जातो, जो चामड्याला टिकाऊ बनवतो आणि त्वचेला कोणतीही हानी पोहोचू देत नाही. या चप्पलांना उष्णता शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता असल्यामुळे त्या आरोग्यदायी मानल्या जातात.
या वादावर PRADA कडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, जागतिक स्तरावर फॅशन ब्रँड्सनी पारंपरिक डिझाईन्स वापरताना मूळ कलाकारांना आर्थिक लाभ आणि किमान मान्यता मिळावी, ही मागणी अधिक तीव्र झाली आहे.