

लंडन : ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांचे भाऊ अँड्रयू यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता पोलिसांनी त्यांना सँडरिंगहॅम येथील त्यांच्या घरी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे गुरुवारी त्यांचा वाढदिवस होता.
एपस्टीन प्रकरणातील पीडित व्हर्जिनिया गिफ्रे यांनी आरोप केला होता की, २००१ मध्ये प्रिन्स अँड्रयू यांनी त्या १७ वर्षांच्या असताना त्यांचे लैंगिक शोषण केले होते. तथापि, अँड्रयू यांनी गिफ्रे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. गिफ्रे यांचे एप्रिल २०२५ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे म्हटले गेले.
हा खटला अँड्रयू यांच्या ब्रिटनचे व्यापार दूत म्हणून काम करण्याच्या काळातील असल्याचे मानले जाते. २००१ मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती, परंतु १० वर्षांनंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यावेळी अमेरिकन गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी असलेल्या संबंधांमुळे त्यांचे नाव वादात सापडले होते. अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे की, अँड्रयू यांचा पदावर असताना एपस्टीनशी संपर्क होता.
अँड्रयू यांना होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा
सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन करणे हा इंग्लंडमध्ये गंभीर गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा जन्मठेपेची आहे. हा खटला फक्त गंभीर गुन्हेगारी आरोपांखाली न्यायालयात चालवता येतो.