
जगभरात विमान अपघातांच्या मालिका सुरूच आहेत. आता रशियामध्येही मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चीनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या पूर्वेकडील अमूर प्रदेशात अंगारा एअरलाइन्सच्या An-24 या प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सर्व ५० जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात ४३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. त्यामध्ये पाच लहान मुलांचाही समावेश होता. सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे विमान सोव्हिएत काळातील असून जवळपास ५० वर्षे जुने होते. विमानाच्या टेल क्रमांकावरून ते १९७६ मध्ये बांधले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विमान ब्लागोव्हेशचेन्स्कहून खाबारोव्स्क मार्गे टिंडा शहराकडे जात होते. मात्र टिंडा जवळ येताच विमान अचानक रडारवरून बेपत्ता झाले. यावेळी हवामान खूप खराब होते आणि दृश्यता कमी होती. वैमानिकाने लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान, विमान वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क पूर्णपणे तुटला.
या नंतर बचाव पथकांनी शोधमोहीम राबवली. त्यांना टिंडा शहरापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात टेकडीवर विमानाचे जळालेले अवशेष सापडले. या संदर्भात सोशल मीडियावर एक कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जळणाऱ्या विमानाचे दृश्य स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून चित्रीत केल्याचे समजते.
अमूरचे गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह यांनी सांगितले की, शोध व बचावकार्यासाठी सर्व आवश्यक सैन्य आणि संसाधने तैनात करण्यात आली आहेत.