
वॉशिंग्टन डीसी येथे भारत सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते शशी थरूर हे एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे गेले. वॉशिंग्टन डीसी येथे परराष्ट्र धोरण परिषदेत थरूर यांच्या चिरंजीवाने म्हणजेच इशान थरूर याने थेट आपल्या वडिलांना प्रश्न विचारला. शशी थरूर यांनी देखील या प्रश्नाचे लक्षवेधी उत्तर दिले. या उत्तरामध्ये त्यांनी थोडक्यात पाकिस्तानी दहशतवादी मुद्दयावर भाष्य केले.
इशानचा प्रश्न -
शशी थरूर यांचा मुलगा इशान हा ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये जागतिक घडामोडींचा विश्लेषक लेखक आहे. त्याने आपल्या माध्यमाचे प्रतिनिधित्व करत शशी थरूर यांना प्रश्न विचारला की या दौऱ्यात तुम्हाला कोणत्याही देशाने पाकिस्तानने केलेल्या पहिल्या हल्ल्याचे (पहलगाम) पुरावे मागितले का? तसेच पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याचे आरोप फेटाळण्याविषयी तुमचे मत काय आहे?
थरूर यांचे महत्त्वपूर्ण उत्तर -
इशानने प्रश्न विचारताच थरूर हसले आणि हा तर माझाच मुलगा आहे. आणि तो असे प्रश्न विचारू शकतो यात शंकाच नाही असे उपस्थितांना सांगितले. तसेच, इशानने विचारलेल्या प्रश्नावर थरूर म्हणाले, की भारताने 'ऑपरेशन सिंदूर' ठोस पुराव्यांअंतीच राबवले असून कोणत्याही देशाने आमच्याकडे पुरावे मागितले नाहीत. उपस्थित देशांना पाकिस्तानच्या भूमिकेबाबत कोणतीही शंका नव्हती, मात्र माध्यमांनी दोन-तीन ठिकाणी अशा प्रश्नांची विचारणा केली होती.
तसेच, पाकिस्तानची दहशतवादी पार्श्वभूमी स्पष्ट करताना थरूर यांनी तीन गोष्टी मांडल्या. पहिले म्हणजे पाकिस्तानने गेल्या ३७ वर्षांपासून वारंवार दहशतवादी हल्ले केले आहेत. पण, त्याचे आरोप मात्र नेहमी फेटाळले आहेत. दुसरे म्हणजे ओसामा बिन लादेन कुठे आहे? याची माहिती पाकिस्तानला नसल्याचे पाकिस्तानने दाखवले पण, शेवटी तो इस्लामाबादजवळील लष्करी छावणीच्या शेजारी एका सुरक्षित घरात सापडला. हे अमेरिकेचे नागरिक विसरले नाहीत.
आणि तिसरे म्हणजे मुंबईवरील २६/११ हल्ल्याचेही संबंध पाकिस्तानने नाकरले. पण, या हल्ल्याचा दहशतवादी जीवंत पकडला गेला. त्याच्या चौकशीत तो पाकिस्तानमध्ये कुठे राहत होता? त्याचे घर, काम, त्याला पाकिस्तानमध्ये कुठे प्रशिक्षण दिले गेले हे सर्व समोर आलेच. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की पाकिस्तानचा हेतु काय आहे! ते आतंकवादी पाठवतील आणि त्यांना रंगेहात पकडेपर्यंत आरोप फेटाळतील. असे स्पष्टीकरण देत त्यांनी पाकिस्तानची दहशतवादी भूमिका स्पष्ट केली.
इशानने पत्रकार म्हणून प्रश्न विचारला आणि थरूर यांनी संसदपटू व मुत्सद्दीपणाने उत्तर दिले. या उत्तरातून त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानचा जागतिक पातळीवरील दहशतवादी दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित केला.