

इस्रायलने शनिवारी (दि. २८) इराणची राजधानी तेहरानवर प्रतिबंधात्मक (Preemptive Strike) क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात तेहरानच्या मध्यवर्ती भागात मोठे स्फोट घडवून आणले त्यामुळे परिसरात दाट धूर पसरला. या घटनेमुळे आधीच तणावपूर्ण असलेली मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी गंभीर बनली असून मोठ्या संघर्षाची भीती व्यक्त केली जात आहे.
इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, युनिव्हर्सिटी स्ट्रीट आणि जोमहोरी परिसरात काही क्षेपणास्त्रे आदळली. तसेच पाश्चर स्ट्रीट परिसरातून मोठ्या प्रमाणात धूर उसळताना दिसला. हा भाग महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांच्या जवळ असल्यामुळे अत्यंत संवेदनशील मानला जातो. मात्र, या हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली का, याबाबत इराणकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
इस्रायलमध्ये देशव्यापी सतर्कता
या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये देशव्यापी सतर्कता वाढवण्यात आली आहे. इस्रायलने आणीबाणी जाहीर केली असून अनेक भागांत हवाई हल्ल्याचे सायरन सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, नागरिकांना घरून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला
दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीव येथील भारतीय दूतावासाने इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दूतावासाने जारी केलेल्या परिपत्रकात भारतीयांनी इस्रायली अधिकाऱ्यांनी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या सर्व सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या राहत्या किंवा कामाच्या परिसरातील सुरक्षित आश्रयस्थाने आधीच ओळखून ठेवावीत आणि शक्य तितक्या त्या ठिकाणांच्या जवळ राहावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
२४ तास आपत्कालीन हेल्पलाइन
भारतीय दूतावासाने पुढील आदेश येईपर्यंत सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक बातम्या, अधिकृत घोषणा आणि आपत्कालीन इशारे नियमितपणे तपासावेत आणि परिस्थितीतील बदलांनुसार आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी दूतावासाने २४ तास आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक (+९७२-५४-७५२०७११) आणि cons1.telaviv@mea.gov.in हा ई-मेल जाहीर केला आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती चिघळत असल्याने भारतीय नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अणु करारावरून तणाव
हा हल्ला अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या अणु कराराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झाला आहे. जिनिव्हामध्ये नुकतीच चर्चेचा तिसरा टप्पा पार पडला असून पुढील बैठकीचे नियोजन सुरू आहे. मात्र, गेल्या काही काळात इस्रायल आणि इराणमधील तणाव सतत वाढत असून गुप्त कारवायांपासून थेट क्षेपणास्त्र हल्ल्यांपर्यंत परिस्थिती पोहोचली आहे.
या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा लष्करी संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात असून सध्या संपूर्ण जगाचे लक्ष मध्यपूर्वेतील घडामोडींवर लागले आहे.