Video : थायलंडमध्ये विद्यार्थ्याचा रक्तरंजित हल्ला; आधी आजी-आजोबांना संपवलं, नंतर शाळेत अंधाधुंद गोळीबार अन् शेवटी...

आरोपी विद्यार्थ्याने शाळेत जाण्यापूर्वी स्वतःच्या घरी आजी-आजोबांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर तो...
Video : थायलंडमध्ये विद्यार्थ्याचा रक्तरंजित हल्ला; आधी आजी-आजोबांना संपवलं, नंतर शाळेत अंधाधुंद गोळीबार अन् शेवटी...
Video : थायलंडमध्ये विद्यार्थ्याचा रक्तरंजित हल्ला; आधी आजी-आजोबांना संपवलं, नंतर शाळेत अंधाधुंद गोळीबार अन् शेवटी...(Photo-X)
Published on

थायलंड : थायलंडमधील नॉन्थाबुरी प्रांतात शुक्रवारी (दि. ७) १४ वर्षीय विद्यार्थ्याने आधी आपल्या आजी-आजोबांची हत्या केली. त्यानंतर त्याने शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या रक्तरंजित हल्ल्यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू, तर १५ जण जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असून, या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास थायलंड पोलिसांकडून सुरू आहे.

वृत्तानुसार, आरोपी विद्यार्थ्याने शाळेत जाण्यापूर्वी स्वतःच्या घरी आजी-आजोबांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर तो डेब्सिरिन नॉन्थाबुरी स्कूलमध्ये पोहोचला आणि विद्यार्थी तसेच शिक्षकांवर गोळीबार सुरू केला.

२६ गोळ्या झाडल्या, घटनास्थळी काडतुसे जप्त

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीने २६ गोळ्या झाडल्या. घटनास्थळावरून ३४ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. गोळीबार सुरू होताच शाळेत एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी वर्गखोल्यांमधून बाहेर पळाले, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू

थायलंडच्या शिक्षणमंत्र्यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

तिसऱ्या मजल्यावर स्वतःला कोंडून घेतले अन्...

पोलिसांनी हल्लेखोराची ओळख शाळेतील विद्यार्थी म्हणून पटवली आहे. गोळीबारानंतर त्याने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर स्वतःला कोंडून घेतले आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

गोळीबारामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. हल्ल्यापूर्वी घडलेल्या घटनांचा आणि आरोपीच्या हालचालींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. त्याच्या कुटुंबीयांची तसेच शाळेतील संबंधितांची चौकशीही केली जात आहे.

यंदाच्या वर्षातील दुसरी शालेय गोळीबाराची घटना

थायलंडमध्ये यावर्षी घडलेली ही दुसरी शालेय गोळीबाराची घटना आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात देशाच्या दक्षिण भागातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात एका शिक्षकाचा मृत्यू झाला होता, तर एक विद्यार्थी जखमी झाला होता.

शाळांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर थायलंडमधील शाळांची सुरक्षा, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न आणि बंदुका सहज उपलब्ध होण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमधील सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in