इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ - ट्रम्प

इराणबरोबर व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशावर २५ टक्के टॅरिफ आकारण्यात येईल, इतकेच नव्हे तर हा नियम त्वरित लागू केला जाणार असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देत आपला मोर्चा इराणकडे वळविला आहे.
इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ - ट्रम्प
Published on

न्यू यॉर्क/वॉशिंग्टन : इराणबरोबर व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशावर २५ टक्के टॅरिफ आकारण्यात येईल, इतकेच नव्हे तर हा नियम त्वरित लागू केला जाणार असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देत आपला मोर्चा इराणकडे वळविला आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या इराणमध्ये हिंसाचाराचा भडका उडाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तेथील सरकारविरोधात आक्रमक आंदोलने केली जात आहे. यादरम्यान इराणवर राजकीय दबाव वाढविण्यासाठी अमेरिकेने टॅरिफचे हत्यार उगारले आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाचा फटका भारतासह काही देशांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्या देशांवर परिणाम?

इराणवर लष्करी कारवाई करण्याचा विचार करत असतानाच ट्रम्प यांनी आता इराणच्या व्यापारी भागीदारांना लक्ष्य केले आहे. त्यांनी केलेल्या टॅरिफ घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम चीन, भारत, ब्राझील, तुर्की आणि रशियावर होण्याची शक्यता आहे. सध्या चीन हा इराणचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याचे सांगितले जाते. नवीन टॅरिफमुळे चीनच्या वस्तूंवर एकूण ४५ टक्के शुल्क लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात इराणशी जवळीक असल्याने आधीच निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियाच्या अर्थव्यवस्थेवर या टॅरिफमुळे अधिकच ताण येऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ - ट्रम्प
ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर? भारत-अमेरिका व्यापार करारावर आजपासून पुन्हा चर्चा

भारतालाही फटका

भारत हा इराणच्या पाच मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, २०२४-२५ मध्ये भारताने इराणला १.२४ अब्ज डॉलरची निर्यात केली. याच कालवधीत इराणकडून भारतात ०.४४ अब्ज डॉलरची आयात झाली. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा इराणशी होणारा एकूण व्यापार १.६८ अब्ज डॉलर इतका होता. भारताकडून इराणला बासमती तांदूळ, चहा, साखर, फळे, औषधे, शीतपेये, कडधान्ये आणि मांस यांची निर्यात होते; तर इराणकडून मेथनॉल, पेट्रोलियम बिटुमन, सफरचंद, एलपीजी, खजूर, रसायने, बदाम यांची आयात केली जाते. दोन्ही देशांमधील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदराच्या प्रकल्पावरही अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in